आयात शुल्क कपातीनंतर सोन्याच्या मागणीत तब्बल १८ टक्के वाढ : डब्ल्यूजीसी अहवाल
30-Oct-2024
Total Views |
मुंबई : भारतात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ दिसून आली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत सोन्याच्या मागणीत तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण मागणी २४८.३ टन इतकी झाली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्याच्या आयात शुल्कात कपातीची तरतूद केली. त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. आता जागतिक सुवर्ण परिषद(डब्ल्यूजीसी)ने चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत सोन्याच्या मागणीचा एकूण कल अहवाल सादर केला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी याच तिमाहीत सोन्याची एकूण मागणी २१०.२ टन इतकी होती. डब्ल्यूजीसीच्या अहवालानुसार सोन्याच्या किमती सर्वकालीन उच्चांकावर असून गुंतवणूकदारांचा भाव कमी होण्याकडे कल वाढू शकतो. एकूण वार्षिक सोन्याची मागणी ७००-७५० टन राहण्याची शक्यता असून मागील वर्षीच्या तुलनेत थोडी कमी असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात धनत्रयोदशी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या एकूण मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
२०२३ मध्ये भारतातील सोन्याची मागणी ७६१ टन इतकी होती. तसेच, किरकोळ विक्रेत्यांकडून धनत्रयोदशीच्या मोठ्या मागणीमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा दर ३०० रुपयांनी वाढून ८१,४०० रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकावर असलेल्या सोन्याच्या तिसऱ्या तिमाहीत मागणी १८ टक्क्यांनी वाढून २४८.३ टन इतकी नोंदविण्यात आली आहे. मूल्यांकनाच्या दृष्टीने तिमाहीत सोन्याची मागणी ५३ टक्क्यांनी वाढून १,६५,३८० कोटी रुपये इतकी झाली.