स्वप्न पाहा, वय नाही! अनुपम खेर यांचा 'विजय 69' चित्रपट येतोय लवकरच...

    30-Oct-2024
Total Views |

vijay 69 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आणि आता पुन्हा एकदा ते एका वेगळ्या विषयासह नव्या भूमिकेतही प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘विजय 69’ असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाचं कथानक एका ६९ वयाच्या वयोवृद्ध व्यक्तीच्या जीवनावर आधारित असून नवी स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पुर्ण करण्यासाठी वयोमर्यादा नसते असा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 
अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'विजय 69' चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. प्रत्येक माणसाची इच्छा असते की, जेव्हा तो या जगातून निघून जाईल तेव्हा त्याच्या चांगल्या कामामुळे तो लोकांच्या स्मरणात राहावा. लोकं त्याला विसरता कामा नये. अशीच विचारधारा विजय यांची असते. या जगाचा निरोप घेण्याआधी काहीतरी वेगळं करण्याची जिद्द या गृहस्थाला स्वस्थ बसू देत नाही.
 

vijay 69 
 
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ते लहान मुलासारखे हट्टी आणि नव्या पिढीवर रागावताना दिसतात. आपलं वय वाढलं आहे, हे सत्य स्वीकारायला ते तयार नसतात. दरम्यान, विजय त्यांचा मित्र चंकी पांडे याला सांगतात की त्यांनी त्यांच्या आयुष्यात असे काहीतरी करायचे आहे जे लोकं कायम लक्षात ठेवतील. आणि हा विचार करत ते ट्रायथलॉन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतात. वयाच्या ६९ वर्षी स्पर्धेत भाग घेऊन नवा विक्रम आपल्या नावे करण्याची त्यांची जिद्द असते. लोकांना वाटतं की म्हातारा वेडा झाला आहे. त्यांना ट्रायथलॉन पूर्ण करून नवीन विक्रम घडवायचा आहे, या निर्णयावर ते ठाम असतात. यावर अनेक जणं त्यांच्यावर हसतात. पण तरीही जिद्दीने ते आपले स्वप्न पुर्ण करण्यास यशस्वी ठरतात का हे पाहण्यासाठी विजय 69’ हा चित्रपट पाहावाच लागेल.
'विजय 69' या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय रॉय यांनी केले असून चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. दरम्यान, मनीष शर्मा निर्मित हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे.