मुंबई : उबाठा गटाचं नाव बदलून कचरा पार्टी ठेवायला हवं. सेंचुरी मारण्याच्या बाता करणाऱ्या संजय राऊत आणि उबाठा गटाला केवळ ८८ जागांवर समाधान मानावे लागले, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना उबाठा गटावर निशाणा साधला.
नितेश राणे म्हणाले की, "शिवसेना उबाठा या पक्षाने आपले नाव बदलून कचरा पार्टी ठेवायला हवे. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाचा काँग्रेस इतक्या वेळा कचरा करत आहेत की, आता त्यांना उबाठा नाव शोभत नाही. आधी मुख्यमंत्रीपदाच्या नावावरून कचरा केला. दिल्लीसमोर मुजरा करून आल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी काँग्रेस नेते तयार नव्हते."
"त्यानंतरही आम्ही सेंचूरी मारणार, असं संजय राऊत सांगायचे. पण सेंचुरीसाठी किमान शंभर जागा तरी लढवाव्या लागतात. मात्र, शंभर जागा सोडाच ते सध्या ८८ जागांवर आहेत आणि ४ नोव्हेंबरपर्यंत यावरूनही खाली येतील. सेंचुरी मारण्याच्या बाता करणाऱ्या संजय राऊतांना आता ८८ जागांवर गुंडाळावे लागले आहे. आता उद्धव ठाकरेंना राहूल गांधींचं भेटणंही मुश्कील झालं आहे. त्यांना आता राहूल गांधींच्या आजूबाजूच्या लोकांसोबतच चर्चा करावी लागत आहे. आठवडाभरापासून राहूल गांधी ठाकरेंचे फोन घेत नाहीत, अशी माहिती आहे. त्यामुळे याला नियतीची चपराक म्हणतात," असा घणाघातही राणेंनी केला आहे.