एसटीच्या प्रेमाचा छंद लागलेल्या आणि पुढे एसटीच्या प्रगतीसाठी अविरतपणे कार्य करणार्या ‘अवलिया प्रवासी’ रोहित धेंडे (Rohit Dhende) यांच्याविषयी...
प्रवास हा तसा प्रत्येकाच्या आवडीचा. पण, या प्रवासी वाहनांमध्ये कधी कोणाला एसटी निरीक्षणाचा छंद असल्याचे ऐकणे दुरापास्तच! पण, ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या बसचे निरीक्षण करण्याचा छंद जडलेला एक तरुण, आज त्याच्या छंदाच्या माध्यमातून महामंडळाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याची ही गोष्ट!
रोहित दादासाहेब धेंडे यांचा जन्म ठाण्यातील एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. आई गृहिणी आणि वडील सनदी लेखापाल. त्यामुळे एका सामान्य मराठी कुटुंबात जसे वातावरण अपेक्षित आहे, तसेच वातावरण रोहित यांना लाभले. रोहित यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण ठाण्यातच पूर्ण केले. लहानपणापासूनच शाळेतील सहली असो किंवा गावाला जाणे असो, रोहितचा प्रवास कायमच महामंडळाच्या बसने व्हायचा. त्यामुळे लहानपणापासूनच महामंडळाच्या बसचा आणि रोहितचा जवळचा संबंध आला. तिथे त्यांची नाळ एसटीशी जोडली गेली, ती कायमचीच!
आजही लोक कंटाळा आला की उद्यानात जातात, रोहित यांची पाऊले मात्र अलगद एसटी स्टॅण्डकडे वळतात. तिथे एसटीशी निगडित अनेक बाबींचे निरीक्षण एसटी आगारात बसून रोहित आजही करतात. मुळात बारावीपर्यंतचे शिक्षण घेईपर्यंत वर्षातून क्वचित येणारा एसटीचा संबंध, पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेल्याने वाढला. मग मात्र, नेहमीची ठरलेली गाडी त्यातील वाहक आणि चालक, ठरलेले आसन असे सगळ्यांशीच रोहित यांचे ऋणानुबंध जुळले. मग सणवार असो किंवा त्या गाडीचे महत्त्वाचे टप्पे असोत, यावर स्वत:ची पदरमोड करून रोहित यांनी ती गाडी सजवली. पुण्यात शिक्षणासाठी गेल्याने आता एसटीचे अनेक मार्ग नव्याने रोहित यांना खुणवू लागले. नवनवीन वाटा दिसू लागल्या. त्यामुळे या प्रत्येक वाटांवर एकदा तरी एसटीने प्रवास करून महाराष्ट्र पालथा घालावा, असे रोहित यांनी निश्चित केले. त्यावेळी हाताशी असलेले पैसे लक्षात घेऊन, त्यांनी चार दिवसांचा पास काढला आणि एसटीने थेट नागपूर गाठले. तेव्हापासून आजतागयत रोहित यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाचे सगळ्या म्हणजे, 250 आगारांना भेट दिली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाचा देखील समावेश आहे.प्रत्येक 50 किमीवर महाराष्ट्र बदलतो, याचा ‘याची देही याची डोळा’ अनुभव घ्यायचा असेल तर एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे रोहित सांगतात.
एसटीचा संपूर्ण प्रवास वर्णन करणारी सर्व छायाचित्रे रोहित यांच्या संग्रही आहेत. त्याचप्रमाणे एसटीची पहिली फेरी, त्याचे चालक आणि वाहक असे एसटीच्या इतिहासातील अनेक टप्प्यांचे तपशील यांचीही रोहित यांच्याकडे रीतसर नोंद आहे. रोहित यांचे निरीक्षण इतके सुक्ष्म आहे की, एसटीचे फलक लिहिण्याच्या पद्धती, त्यांचे हस्ताक्षर या सर्वांचे ते लीलया वर्णन करतात.
“विमान ते रेल्वेचे एसी तिकीट जरी मला कोणी दिले, तरी मी एसटीने प्रवास करणे पसंद करेन,” असे रोहित सांगतात. आज एसटीच्या विविध दर्जाच्या अनेक गाड्या रस्त्यावर सेवा देत आहेत. मात्र, रोहित यांचा जीव जडला आहे तो पारंपरिक ’लालपरीवर’च. एसटीचा प्रवास हा सर्वार्थाने समानता निर्माण करणारा आहे. एकच गाडी असल्याने, श्रीमंत ते गरीब असे सर्वच तिथे एकसमान असतात, असे रोहित सांगतात.
सुरूवातीला एसटीसंबंधीचे फोटो आवड म्हणून रोहित यांनी समाजमाध्यमांवर शेअर करायला सुरूवात केली. नंतर महाराष्ट्रातील काही समविचारी तरुण रोहित यांच्याशी जोडले गेले. आता महामंडळाशी जोडून घेऊन काम करताना, रोहित आणि त्यांच्या मित्रपरिवाराने अनेक छोटी-मोठी सर्वेक्षणे करत महामंडळाला सहकार्य केले आहे. मात्र, कायद्यानुसार आवश्यक अटींची पूर्तता नसल्याने एसटी महामंडळ रोहित यांची सीमित मदतच घेत होते. अखेर एसटीमधील काही अधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार रोहित आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी ’बस फॉर अस फाऊंडेशन’या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्यानंतर रोहित यांनी एसटीचा समग्र प्रवास मांडणारे एक प्रदर्शन एसटी आगारात आयोजित केले होते. त्यावेळी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्या प्रदर्शनाला भेट देत कौतुक केले होते. त्यानंतर रोहित यांनी ‘एक्झिबिशन ऑन व्हील’ या संकल्पनेच्या माध्यमातून, काही बसमध्येसुद्धा एसटीचा प्रवास दाखवला. रोहित यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून एसटी महामंडळाला अनेक सूचना केल्या आहेत. त्यामध्ये एसटीचे रंग ते गाडीच्या टप्प्याची फेररचना करणे असो या सगळ्याचाच समावेश आहे.
सध्या रोहित एक अॅप्लिकेशन तयार करण्यात मग्न असून, या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व एसटी आगारातील गाड्यांची माहिती मिळणार आहे. एसटीबाबत अनेक चांगले निर्णय निव्वळ अंमलबजावणी न झाल्याने वाईट अवस्थेत असल्याचे शल्यदेखील रोहित यांनी यावेळी बोलून दाखवले. महामंडळाच्या सेवा सुधाराव्यात यासाठी रोहित यांनी प्रयत्न केले असून, त्यांचे मॉडेल महामंडळात विचाराधीन आहे. ‘अवलिया प्रवासी’ याच नावाचे रोहित यांचे फेसबुक खाते असून, त्यावरही ते महामंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती ते देत असतात. एसटीला समाजमाध्यमांवर सक्रिय करणे हे पुढचे ध्येय रोहित यांनी निश्चित केले आहे. एसटीच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या रोहित यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनंत शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर