मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्या वतीने यंदाही ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठी विचारधारा प्रतिष्ठान, गोरेगाव आणि अमेरिकेतील लॉस एंजिइल्स येथील ‘मराठी संस्कृती.कॉम-एमसीएफ फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्र लेखक संघाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपादक-प्रकाशकांनी आपल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती ‘घरकुल सोसायटी, रूम नं. ६१२, ६ वा मजला, सेंचुरी बाजार लेन, भुस्सा इंड. समोर, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५’ या पत्त्यावर पाठवायच्या आहेत.
१९७६ पासून मराठी वृत्तपत्र लेखक संघ आयोजित या स्पर्धेसाठी दरवर्षी महाराष्ट्र आणि इतर राज्यातूनही दिवाळी अंक पाठवले जातात. सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का. र. मित्र पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विनोदी अंकासाठी आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मुलांच्या अंकासाठी साने गुरुजी स्मृती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला संपादित अंकासाठी मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट आरोग्यविषयक अंकासाठी मनोहरपंत चिवटे स्मृती पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार देण्यात येतात. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडतो. शिवाय स्पर्धेसाठी आलेले अंक मुंबई-ठाणे शहरात प्रदर्शन आयोजित करून मांडले जातात. त्यानंतर हे अंक शाळा-वाचनालयांना मोफत दिले जातात.