मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Protecting Islamic Jihadi) बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर अद्यापही येथील हिंदू, बौद्ध अल्पसंख्याकांना इस्लामिक कट्टरपंथींकडून लक्ष्य केले जात आहे. असे असताना येथील मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने इस्लामिक कट्टरपंथींना कायदेशीर संरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे उघडकीस आले आहे. या निर्णयाने संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली होती.
हे वाचलंत का? : दिवाळी साजरी करण्यावरून हिंदू महिलांना जिहाद्यांची शिवीगाळ
मिळालेल्या वृत्तानुसार, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दि. १५ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान झालेल्या निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या 'कट्टरपंथींना' (निदर्शकांना) कोणत्याही शिक्षेपासून सूट देणारा आदेश जारी केला आहे. युनूस सरकारचे हे पाऊलही वाद निर्माण करणारे आहे, कारण अनेक लोक याला त्यावेळच्या हिंसाचाराची जबाबदारी टाळण्याचा एक मार्ग मानतात. सध्या या नियमाच्या अन्वयार्थाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांनाही संरक्षण मिळू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
बांगलादेशच्या गृह मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “नव्या भेदभावरहित बांगलादेशकडे प्रवास सुरू झाला आहे. जे विद्यार्थी आणि नागरिक या अशांततेत सामील आहेत त्यांना १५ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान केलेल्या कृत्याबद्दल शिक्षा, अटक किंवा छळ सहन करावा लागणार नाही." महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशात हिंदू, मुस्लिम, अहमदिया सुफी समुदाय, बौद्ध आणि ख्रिश्चन यांसारख्या अल्पसंख्याक समुदायांवर भीषण हल्ले झाले आहेत.