युद्धभूमीवर शेवटच्या घटकेपर्यंत नऊ महिन्यांच्या बाळासाठी लढणाऱ्या आईचा करुण अंत

03 Oct 2024 15:43:49

mom isr
 
जेरुसलेम : येमेनच्या हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अवीव मध्ये ड्रोन हल्ला केल्यानंतर, शहराच्या जाफा या भागात दोन पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून, ७ जणं गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याच सोबत, दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

या हल्ल्यात इनबार सेगेव-विग्डर ही ३३ वर्षीय माता मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या ९ महिन्यांच्या नवजात शिशुचे रक्षण करताना या मातेने मरणाला कवटाळले. मृत्यूच्या काही तासांआधीच इस्रायली सैनिकांच्या सुरक्षिततेची प्रार्थना करणारी पोस्ट तिने सोशल मिडीयावर शेअर केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला मारेकारी मोहम्मद मेसेक हा १९ वर्षांचा होता, आणि त्याचा साथीदार अहमद हिमौनी हा २५ वर्षांचा होता. त्यांच्याकडे तेल अवीव मध्ये येण्याचा कुठलाही अधिकृत परवाना नव्हता. दोघेही वेस्ट बँक भागातील हेब्रॉन या शहराचे रहिवासी होते. हल्ला करण्याआधी दोघेही अल-नुझा या मशीदीत शिरले, तिथल्या लोकांना बाहेर न जाण्याची धमकी दिली. हातात एम् १६ ही रायफल घेऊन ते बाहेर आले, आणि गोळीबाराला सुरुवात केली.

हमासच्या ब्रिगेडने घेतली जबाबदारी.
या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी हमासच्या एजेदिन अल-कासम ब्रिगेडने घेतली. त्या संदर्भात जाहीर निवेदन देत हमासने कबुली दिली. या ब्रिगेडची स्थापना १९९१ साली झाली होती. गेली अनेक वर्ष गाझा पट्टीत इस्रायलच्या विरोधात हे संघटन कार्यरत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्घाला एक वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत हजारो निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हुथी बंडखोरांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर या युद्घाला नवीन वळण लागण्याची शक्याता आहे.



 
Powered By Sangraha 9.0