रिलीजला तीन दिवस बाकी असताना 'सिंघम अगेन'मधील १२ सीन्सला सेन्सॉरने लावली कात्री
29-Oct-2024
Total Views |
मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटाची टक्कर भूल भूलैल्या ३ या चित्रपटासोबत होणार आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी हे दोन्ही ब्लॉक बस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिंघम अगेन चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते काढून टाकण्यास सांगितले आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाचं कथानक यावेळी रामायणाशी जोडण्यात आलं आहे. आणि त्यामुळेच काही आक्षेपार्ह प्रसंग यात दाखवल्यामुळे चित्रपटातून १२ सीन वगळण्यास सांगण्यात आले आहे.
'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की सध्याच्या काळाचं कथानक रामायणाशी जोडण्यात आलंय. रामायणात जसं रावण माता सीतेचं अपहरण करतो तसंच साधर्म्य साधणारं कथानक 'सिंघम अगेन'मध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे सेन्सॉरने चित्रपटाच्या टीमला सुरुवातीला Disclaimer टाकायला सांगितलं आहे. "ही कहाणी पूर्ण काल्पनिक आहे. या चित्रपटाचीगोष्ट प्रभू श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारीत असली तरीही कोणतीही व्यक्तिरेखा प्रभू श्रीराम यांच्या रुपात बघू नये. चित्रपटाच्या कथेत आजच्या काळातले लोक, परंपरा, समाज, संस्कृती दाखवण्यात आली आहे", असे लिहण्यास सांगितले आहे.
याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सांगितलेले प्रमुख बदल पुढीलप्रमाणे
१. सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षक समितीने निर्मात्यांना 'सिंघम अगेन'मध्ये दोन ठिकाणी २३ सेकंदांचा 'मॅच कट' सीन बदलण्यास सांगितले आहे. या सीनमध्ये प्रभू श्रीराम, सीता माता आणि हनुमान यांना सिंघम, अवनी आणि सिम्बाच्या रुपात दाखवले आहे.
२. सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शक रोहित शेट्टीला 'रावणाने सीतेला धरून खेचणे आणि ढकलण्या'चा १५ सेकंदाचा सीन हटवण्यास सांगितले आहे.
३. सिंघम आणि श्रीरामांचे दृश्य असलेले एक दृश्यही चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितले आहे.
४. सेन्सॉर बोर्डाने २९ सेकंदाचा एक सीन काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात हनुमान जळताना आणि सिंबा फ्लर्ट करताना दाखवला आहे.
५. 'सिंघम अगेन'मध्ये चार ठिकाणी झुबेर नावाच्या पात्राचे संवाद बदलले आहेत. जुबेरचा एक संवाद असा आहे की, 'मी तुझ्या कथेचा रावण आहे, तुझ्या आवडीच्या व्यक्तीला पाठव...'. हा संवादही बदलण्यात आला आहे.
६. या चित्रपटात करीना कपूर अवनीची भूमिका साकारत असून तिचे काही सीन्स देखील बदलण्यात आले आहेत.
७. शेजारील देशांशी भारताच्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो असा २६ सेकंदाचा संवादही काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
८. चित्रपटात पोलीस ठाण्यात एकाचा शिरच्छेद केल्याचा सीन आहे, तोही सेन्सॉर बोर्डाने हटवला आहे.
९. पोलीस ठाण्याच्या सीनमध्ये एक धार्मिक ध्वज दाखवण्यात आला आहे, तो काढून टाकण्यास सांगितले असून बॅकग्राउंडला सुरू असणारे शिवस्तोत्रही हटवण्यात आले आहे.
दरम्यान, रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगण, करिना कपूर, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पडूकोण अशी अनेक कलाकार मंडळी आहेत.