वांद्रे गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस पकडण्यासाठी जमलेल्या गर्दीमुळे नऊजणांना गंभीर दुखापत झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. अर्थात यावर नंतर वांद्रे टर्मिनसकडून आलेल्या स्पष्टीकरणात हा प्रकार चेंगराचेंगरीचा नसून, फलाटावर येणार्या चालत्या गाडीत शिरण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
असे अपघात कायमच मनाला चटका लावून जातात. मात्र, काहींना यात दिसते ते राजकारण! काहींना दिसते, ती पोळी भाजून घेण्याची नामी संधी. यांना ना कशाचे सोयर ना सुतक! असाच प्रकार शिवसेना उबाठा गटाचे नेते असलेल्या आदित्य ठाकरे यांच्याबाबत घडला आहे. वांद्रे टर्मिनसमधील दुर्दैवी घटनेची संधी साधत त्यांनी टीकेचा सूर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वळवला आहे. बरं, लोकशाहीमध्ये टीका ही स्वागतार्हच असते. पण, किमान ती करताना, आपण कोणाविषयी बोलतो, याचातरी विचार करावा, पण त्याबाबतीतही इथे काळोखच दिसला.
रेल्वेमंत्री हे फक्त ‘रीलमंत्री’ असून ते सर्वार्थाने अक्षम रेल्वेमंत्री असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी ठोकून दिले. मुळातच, आदित्य ठाकरे यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, वैष्णव यांचे आजोबा काही पराक्रमी नेते नाहीत, की त्यांचे वडील मंत्रिमंडळप्रमुख! त्यांनी केलेल्या ज्ञानार्जनामुळे, प्रशासनक्षेत्रातील त्यांच्या उत्तम कामगिरी आणि अनुभवामुळेच त्यांना सन्मानाने मंत्रिपद देण्यात आले आहे. अर्थात, विश्वात जे काही उत्तम, उदात्त, उन्नत घडले आहे, त्याचा कारक घटक फक्त एकच घराणे असल्याचा आविर्भाव ज्यांना गुणसुत्रांमधूनच आला आहे, त्यांना बाकीच्यांचे गुण दिसतीलच कसे? पण किमान, टीका करताना समोरचा कोण आहे? त्याचे ज्ञान, अनुभव, पात्रता यांबाबत थोडीतरी फिकीर कराल की नाही? पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. राजकारणात विरोधात बसल्यावरसुद्धा टीका करण्याचे एक तंत्र असते. मात्र हल्लीच ज्यांचे राजकारण सुरु झाले आहे, त्या आदित्य ठाकरे यांना हे तंत्र उमगलेले दिसत नाही. आपण कोण आहोत? एकूण कर्तृत्त्व काय? याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचे आणि राजकीय आकस जगासमोर मांडायचा, याला काही टीका म्हणत नाहीत. पण हे आदित्यांना सांगणार कोण? पण किमान टीका करताना, समोरची व्यक्ती कर्तबगार असून वशिल्याचे शिलेदार नाहीत, हे लक्षात ठेवले तरी उत्तम!
मविआची कुरबुर
'बहुत लोक मेळवावे, येक विचारे भरावे’ असे रामदास स्वामींनी म्हटले आहेच. मात्र, एका विचाराने न भारता स्वार्थाने प्रेरितवृत्तीने अनेकजण एकत्र आल्यास जे काही निर्माण होते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजेच महाविकास आघाडी होय! विधानसभा निवडणूक जाहीर होऊन, अनेकांनी पक्षांतर करून, अर्ज दाखल करण्याची लगीनघाई सुरुदेखील झाली. तरीसुद्धा मविआमधील जागावाटपाचा तिढा सुटत नाही. प्रत्येकालाच मुख्यमंत्रिपदाची लालसा असल्याने मविआमधील प्रत्येक घटकपक्ष एकमेकांचे पाय खेचण्याकडेच लागला आहे. दीर्घकाळ चर्चा, खलबते, वादविवाद केल्यानंतर अचानक जादूची कांडी फिरली. मग मविआने ८५-८५-८५ चे सूत्र जाहीर केले. जनतेला वाटले, सुटलो चला एकदाचे! पण कसले, काँग्रेस १०० जागी लढू शकते, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. त्यावर प्रत्येकाला हव्या तेवढ्या जागा त्यांच्या कोट्याप्रमाणे लढवण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. कुठेतरी थांबलेली मविआची कुरुबुर पुन्हा सुरु झाली.
नाना पटोले चर्चेत असताना, काँग्रेस इंच इंच लढवत होती. मात्र, अचानाक अदृश्य शक्तीने जादू करावी, असे काही घडले. पण, सत्तेच्या मलईसाठी सगळेच बोके एका समान मतावर आले. मात्र, हे जे काही झाले, ते ‘काँग्रेस हायकमांड’ला रुचले नाही. साक्षात युवराज राहुल गांधी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जागावाटपात कमी पडल्याचे सांगत, महाराष्ट्राच्या नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ’खाविंदा’ंची मर्जी संपादन करण्याची लगबग महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना करावी लागली. त्यामुळे बळेच का होईना, आम्ही १००च्या वर जागा लढवत आहोत, आमच्या अजून जागा जाहीर लवकरच करणार आहोत अशी विधाने काँग्रेसच्या नेत्यांना करणे क्रमप्राप्त झाले. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यातील कलगीतुर्यात मविआमध्ये असलेली कुरबुर अधिक वाढली आहे. त्यामुळे सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आलेले बोके सत्तेआधीच एवढे भांडत असतील, तर सत्तेत आल्यावर स्वार्थासाठी काय करतील, हाच प्रश्न जनताजनार्दनाला पडला आहे. मात्र, या कुरबुरीमुळे सत्तेसाठी मविआचे सारे रुपडे महाराष्ट्रासमोर आले आहे, हेच खरे!