मुंबई : भाजप नेत्या मनिषा चौधरी यांनी सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी दहिसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत बोरीवलीमध्ये भव्य नामांकन रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी भाजप आमदार प्रविण दरेकर, शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मनीषा चौधरी म्हणाल्या की, "आज दहिसरचा विकास सर्वांपुढे आहे. त्यामुळे २० तारखेला सर्वजण कमळाचे बटण दाबणार आहेत. दहिसरची जनता माझे दैवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण विश्वात भारताचे नाव मोठे केले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या विकसित भारताला जोड म्हणून महायूती सरकारच्या काळात केंद्र सरकारने विविध विकासकामांत महाराष्ट्राला मदत केली. हा विकास म्हणजे महायूतीच्या सरकारने केंद्राच्या तिजोरीतून केलेल्या पैशाचा सदूपयोग आहे."
हे वाचलंत का? - ठाण्यातील तिन्ही जागा महायूतीच्याच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
"राज्यात पुन्हा महायूतीचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजना सुरु राहील. आमचे सरकार आल्यावर सगळ्या योजना बंद करू, असे उद्धव ठाकरे म्हणतात. परंतू, जनता जनार्दन जागरूक आहे. लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे लाडकी बहिण उद्धव ठाकरेंना मतदान करतील की, महायूतीला करेल हे स्पष्ट आहे. दहिसरमध्ये विकासाच्या नावावर लोकांची मतं जुळलेली आहेत. कोरोनाकाळात मी स्वत: रोज ६ हजार लोकांना खिचडी बनवून देत होती. मात्र, महाविकास आघाडीने खिचडीचे पैसे खाल्ले, कफनाचे पैसे खाल्ले. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनल्यावर सर्वात आधी दहिसरचा भुखंड खाण्याचे काम केले," अशी टीकाही त्यांनी केली.
मनिषाताई १ लाखांहून अधिक मतांनी निवडून येतील : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, "मनिषाताई एक समाजसेविका आहे. त्या दिवसरात्र २४ तास जनतेत राहतात. त्यांच्या सुख-दु:खात सोबत असतात. त्यांनी ४० वर्षे प्रामाणिकपणे उत्तर मुंबईची सेवा केली आहे. दहिसरच्या आमदार या नात्याने त्यांची समाजात एक प्रतिष्ठा बनली आहे. त्यामुळे दहिसरची जनता मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान करेल. लोकसभा निवडणूकीत केलेली चूक यावेळी लोक करणार नाहीत. भारतात चांगले सरकार येऊन विकास आणि प्रगती व्हावी, असे वाटणारा प्रत्येकजण मनिषाताईला मत देईल. यावेळी त्या १ लाखांहून जास्त मतांनी निवडून येतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.