वाढत्या बॉम्ब धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंदाकडून मार्गदर्शक सूचना जारी
27-Oct-2024
Total Views |
मुंबई : मागील काही दिवसांत विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांना पेव फुटले होते. या खोट्या धमक्यांचा समाज माध्यमांवरून होणारा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. समाज माध्यमांनी विहीत कालमर्यादेत अफवा हटवाव्यात, धमक्यांबाबत तपशीलवार कळवावे आणि यंत्रणांना सहकार्य करण्याचे निर्देश सरकारने मार्गदर्शक सूचनांच्या द्वारे संबंधितांना दिले आहेत.
दरम्यान, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतात कार्यरत असलेल्या विविध विमान कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेष करून समाज माध्यमांवर विविध मंचांसह प्रसाराचे माध्यम ठरू शकणाऱ्या मध्यस्थांच्या जबाबदारीवर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे, माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ याचे काटेकोर पालन करण्यावर सरकारने भर दिला आहे.
यासोबतच सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षा राखण्यासाठी कायद्याला धरून नसलेली आशय सामग्री त्वरित काढून टाकणेही आवश्यक असणार आहे. बॉम्बच्या धमक्यांसारख्या विघातक कृतीमुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षिततेला देखील संभाव्य धोका निर्माण होतो. अशा प्रकारच्या खोट्या धमक्या म्हणजेच फसव्या माहितीमुळे सार्वजनिक सुव्यवस्था, विमान कंपन्यांचे कामकाज आणि विमान प्रवाशांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण होतो.