देशाच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार आवश्यक : एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
27-Oct-2024
Total Views |
मुंबई : विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्राची गरज असून, देशाच्या विकासासाठी डबल इंजिन सराकर असणे आवश्यक आहे असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या दादर येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले असे सुद्धा एस. जयशंकर म्हणाले.
भारत आणि चीन यांच्यातील झालेल्या करारमुळे सीमारेषेवरील भारतीय आणि चीनी सैन्यातील संबंध पूर्वव्रत होणार आहेत. परंतु ही फक्त एक सुरूवात असून भारताला दोन्ही देशांनी आपआपले सैन्य मागे घेण्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे. असे मत जयशंकर यांनी व्यक्त केले. दहशतवादावर बोलताना एस.जयशंकर म्हणाले की, "दहशतावादाचा सामना करण्यासाठी भारत आता सुसज्ज झाला आहे. केवळ भारतासाठीच नव्हे तर, जगासाठी मुंबई हे काऊंटर टेरेरीझमचे प्रतीक आहे. ज्यावेळेस भारत युएनएससीचा सदस्य होता, त्या वेळेस सुरक्षा परिषदेचे आयोजन त्याच हॉटेलात केले गेले जिथे दहशतवादाचा हल्ला झाला होता. अशा वेळेस जेव्हा जगाला सुद्धा या गोष्टीचं दर्शन घडते की, दहशतवादाच्या विरोधी लढाईत भारत सर्वात पुढे आहे. मुंबई मध्ये जो दहशतवादी हल्ला त्याची पुनरोक्ती कदापि होणार नाही. त्या वेळेच्या सरकारने या हल्ल्यानंतर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ही गोष्ट भारत आणि जग दोघांसाठी चांगली नव्हती. भारताला आता हे मान्य नाही, हा बदल मागच्या १० वर्षात झाला आहे."
डबल इंजिन सरकार आवश्यक!
भारतातील परदेशी गुंतवणूकीवर भाष्य करताना, एस जयशंकर म्हणाले " आपल्याकडे गुंतवणूक परिषदांच्या माध्यमातून राज्यांमध्ये गुंतवणूक आणली जाते, त्यानंतर ती गुंतवणूक टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांची निती आणि नियत दोन्ही योग्य असावी लागते. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे. भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे कुणाच्या काळात राज्यात प्रक्लप आले आणि कुणाच्या काळात गेले हे चित्र अगदी स्पष्ट आहे."
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांचा हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे.