ज्येष्ठ स्नेही, शिक्षण क्षेत्रात लेखणीच्या माध्यमातून अतुलनीय योगदान पेरणारे संदीप वाकचौरे यांनी ही किमया साधली आहे. ‘चपराक प्रकाशना’च्या वतीने त्यांची शिक्षण मालेतील दहा पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे. त्यातील ‘शिक्षणाचे प्रश्नोपनिषद’ हे पुस्तक म्हणजे शिक्षणातील मूलभूत प्रश्नांविषयी चर्चा घडवून आणते आहे.
आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, मेंदूही आहे. या सगळ्याचा सगळे जण वापर करतातच असे मात्र मुळीच नाही. महात्मा गांधींची तीन माकडे आपणास माहीत आहेतच. वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका असे त्यांनी सांगितले. त्याचा सोयीस्कर अर्थ अनेकांनी घेतला. परिणामी, समाजात कितीही, कसलेही अराजक माजले, तरी असे महाभाग वाईट वृत्तीच्या विरूद्ध काही बोलत नाहीत, सामान्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न करत नाहीत, दुष्ट शक्तींचा विरोध करण्यास धजावत नाहीत. अशावेळी आपले डोळे, कान, नाक आणि मेंदू सजग ठेवून कोणी कर्तव्य तत्त्पर असेल आणि समाजाला, व्यवस्थेला आंतरिक तळमळीतून काही सांगू पाहत असेल, तर त्याचे स्वागत करायलाच हवे. माझे ज्येष्ठ स्नेही, शिक्षण क्षेत्रात लेखणीच्या माध्यमातून अतुलनीय योगदान पेरणारे संदीप वाकचौरे यांनी ही किमया साधली आहे. ‘चपराक प्रकाशना’च्या वतीने त्यांची शिक्षण मालेतील दहा पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे. त्यातील ‘शिक्षणाचे प्रश्नोपनिषद’ हे पुस्तक म्हणजे शिक्षणातील मूलभूत प्रश्नांविषयी चर्चा घडवून आणते आहे.
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असताना या क्षेत्रातील अपप्रवृत्तीविरूद्ध बोलण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. बालक, पालक आणि शिक्षकांच्या भल्याच्या दृष्टीने त्यांची लेखणी अव्याहतपणे पाझरत असते. ‘अमृत ते काय गोड आम्हापुढे, विष ते बापूडे कडू किती’ हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे वचन त्यांनी सत्यात आणले. शिक्षण क्षेत्रातील वृत्ती-प्रवृत्तीविषयी कठोर भाष्य करताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा राखला नाही. अत्यंत नेमकेपणाने, सुस्पष्टपणे, कुणाचीही अवहेलना, उपमर्द न करता कधी वज्राप्रमाणे कठोर होत, तर कधी आईच्या अंतःकरणाने प्रेमळपणे त्यांनी भाष्य केले आहे. त्यांची चिकित्सक वृत्ती आणि ज्ञानसाधनेची लालसा यामुळेच एक लेखक, एक प्रकाशक आणि शिक्षणासारखा एकच महत्त्वपूर्ण विषय घेऊन बारा पुस्तकांची माला तडीस जात आहे. बघता बघता दहावे पुस्तक वाचकांच्या हाती आले असून, केवळ मराठीच नाही, तर प्रादेशिक भाषेतीलही हा एक विक्रम ठरला आहे. जणू त्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुस्तकांची पाठराखण करत शुभेच्छा दिल्या आहेत.
संदीप वाकचौरे हे मुळात शिक्षक आहेत. त्यांची दृष्टी व्यापक आहे. गेल्या शंभर वर्षांत शिक्षण क्षेत्रात जे बदल झाले, ज्यांनी हाडाची काडे करत निष्ठेने संस्था उभारल्या आणि नंतर नंतर या क्षेत्रातील सेवाभाव बाजूला पडून धंदा केला जाऊ लागला. त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करत वर्तमानातील वास्तवाचा विचार करत, त्यांनी मूलभूत प्रश्नांची मांडणी केली आहे. त्यामुळे या क्षेत्राचे सामर्थ्य आणि मर्यादा याचे विवेचन करताना ते असंख्य दाखले देतात, उदाहरणे सांगतात, आकडेवारी मांडतात. त्यांच्या लेखणीला सत्याचा गंध असल्याने या क्षेत्राचा आरसा दाखविण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत.
आचार्य विनोबा भावे, गिजूभाई बधेका, जे. कृष्णमूर्ती, रजनीश, गांधी, विवेकानंद, अब्दुल कमाल अशा अनेकांचा शिक्षणविचाराचे ते प्रतिपादन करतात. ‘कोविड’च्या काळातील शिक्षण असेल किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे असतील, या प्रत्येक विषयाचा त्यांचा व्यासंग आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विचारवंतांच्या परंपरेतील गॅलरीतील का असेना पण, एक खुर्ची त्यांनी त्यांच्या अभ्यासातून मिळवली आहे. आजवर त्यांनी अनेकांचे शिक्षणविचार महाराष्ट्राला समजावून सांगितले. विहिरीतला मासा तळ्यात यावा, तळ्यातून नदीत जावा आणि नदीतून त्याने समुद्रात सुळकांडी घ्यावी, असा हा त्यांचा प्रवास आहे. ‘शिक्षण याच विषयावर गेली पंधरा-वीस वर्षे नियमितपणे स्तंभलेखन करणारे मराठीतील एकमेव स्तंभलेखक म्हणायला हवे. त्यांचा हा लेखन प्रवास पाहिला, तर वाचकांच्या मला काय सांगायचे आहे ते सहजपणे ध्यानात येईल.
भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करता आपल्याकडे ‘प्रश्नोपनिषद’ महत्त्वाचे मानले गेले आहे. अथर्ववेदाच्या ‘पैप्पलाद’ शाखेतील उपनिषदांचे स्वरूप प्रश्नोत्तररूपी असल्याने त्याचे नाव ‘प्रश्नोपनिषद’ असे आहे. यातील खंडांनाही ‘प्रश्न’ असेच नाव आहे. आद्य शंकराचार्यांनीही ज्या प्राचीन उपनिषदांवर भाष्य लिहिले ती उपनिषदे मानली जातात. ही सर्व परंपरा पाहता, आजच्या काळात संदीप वाकचौरे यांनी या पुस्तकाचे शीर्षक ‘शिक्षणाचे प्रश्नोपनिषद’ असे का योजले असावे, त्याचे उत्तर सहज मिळते. या पुस्तकातील लेखांची ही काही शीर्षके पाहा. ‘शांततेचे शिक्षण केव्हा?’, ‘गरिबांना शिक्षण कधी?’, ‘जीवन शिक्षण कधी?’, ‘शिक्षकांना सन्मान केव्हा?’, ‘शिक्षण मातृभाषेत केव्हा?’, ‘शिक्षण जाहीरनाम्यात कधी?’, ‘विज्ञानाचे काय करायचे?’, ‘प्रतिज्ञा जगण्यात कधी?’, ‘विद्यापीठातून पीठ अधिक विद्या कधी?’, ‘प्रश्न केव्हा विचारणार?’, ‘शिक्षण कौशल्यपूर्ण केव्हा होणार?’, ‘शिक्षण म्हणजे काय रे भाऊ?’ या सगळ्या प्रश्नार्थक शीर्षकातून त्यांना काय मांडायचे आहे ते स्पष्ट होते. शिक्षणातून ‘माणूस’ घडतो का? हा प्रश्न तर त्यांच्या लेखनाचा गाभाच म्हणावा लागेल. त्यांनी उपस्थित केलेल्या या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा निदान प्रयत्न जरी आपल्या राज्यसत्तेने केला, तरी खूप काही साध्य होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगत असतात की, ‘आपला भारत देश विश्वगुरु होईल आणि जगासाठी ज्ञानाची कवाडे उघडी करेल!’ त्यांचा हा दुर्दम्य आशावाद प्रत्यक्षात आणायचा तर, आपल्या शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवणे गरजेचे आहे. ते कसे असावे? याची झलक संदीप वाकचौरे यांच्या या पुस्तकमालेतून मिळते.
त्यांचा स्नेही आणि प्रकाशक म्हणूनच नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून मला वाटते की, विचारांची ठिणगी चेतवणार्या या सर्व पुस्तकांच्या अधिकाधिक प्रती सामान्य वाचकांपर्यंत जाव्यात. शासनाने त्यासाठी काही पुढाकार घेतला, तर प्रबोधनाच्या दृष्टीने ते एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. सध्या जिकडे-तिकडे स्वायत्त महाविद्यालयांचे पेव फुटलेले असल्याने अशा महाविद्यालयांनी, राज्यातील प्रतिष्ठित विद्यापीठांनी या पुस्तकमालेचा विचार करून यातील शक्य ती पुस्तके किंवा त्यातील शक्य तो भाग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. असे झाले तर या पुस्तकमालेचे सार्थक ठरेल.
घनश्याम पाटील
पुस्तकाचे नाव : शिक्षणाचे प्रश्नोपनिषद
लेखक : संदीप वाकचौरे
प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : १७६
मूल्य: ३०० रुपये