मुंबई, दि.२६ : अनेक दशकांची व्यावसायिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या धारावीच्या कुंभारवाड्यातील दिवाळीचा आनंद यंदा द्विगुणित होणार आहे. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या (डीआरपीपीएल) 'धारावी सोशल मिशन' उपक्रमाच्या माध्यमातून यंदा कुंभरवाड्यातून तब्बल १० लाख मातीच्या दिव्यांची खरेदी करण्यात आली आहे.ही आजवर कुंभारवाड्याला मिळालेली ही सर्वात मोठी व्यावसायिक संधी देखील आहे. हे दिवे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने पॅसेंजर एंगेजमेंट उपक्रमात तर अदाणी फाउंडेशनच्यावतीने दिवाळीच्या विविध कार्यक्रमांमध्ये वापरले जाणार आहेत.
या उपक्रमात कुंभारवाड्यातील सुमारे ५०० कुशल आणि अकुशल कामगारांचा सहभाग असून पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या या दिव्यांसाठी कुटुंबातील सर्वच लहानमोठ्यांनी हातभार लावला आहे. गेल्या काही वर्षांपासून सणासुदीच्या दिवसांत केवळ दिवेच नव्हे तर इतर बाबींसाठी देखील ग्राहक रेडिमेड परदेशी वस्तूंना पसंती देताना दिसतात. मात्र, अनेक वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या दिव्यांच्या बाजारपेठेत मातीतील कुशल कामगारांना न्याय देतानाच 'मेड इन इंडिया आणि मेड इन धारावी'चा संदेश देण्यासाठीच धारावी सोशल मिशनने पुढाकार घेतला आहे.
"धारावी हे एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र असून इथे मोठ्या प्रमाणात कुशल कारागीर देखील आहेत. स्थानिक व्यावसायिक आणि लघु उद्योजकांसाठी धारावी सोशल मिशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या उपक्रमांची ही केवळ सुरुवात आहे. या उपक्रमातून स्थानिक उद्योजकांविषयीची प्रतिबद्धता अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न असून अशाच रीतीने भविष्यात देखील सदैव स्थानिक उद्योगांना सहकार्य करण्याचा धारावी सोशल मिशनचा मानस आहे." अशा शब्दांत डीआरपीपीएल च्या प्रवक्त्याने आपली प्रतिक्रिया दिली.
-----
१० लाख इतक्या मोठ्या प्रमाणात दिव्यांची निर्मिती करून त्यांच्या विक्रीसाठी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी कुंभारवाड्यातील बांधवांच्या वतीने डीआरपीपीएलचे आभार मानतो. हा उपक्रम केवळ व्यावसायिकदृष्ट्या आम्हाला फायदेशीर ठरला नसून यातून कुंभारवाड्यात समृद्ध परंपरा अधोरेखित करत स्वदेशीचा नारा देण्यात आला, ही बाब देखील आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे.
- हनीफ गलवानी, कुंभारवाडा पॉटर असोसिएशन