मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Karyakari Mandal Baithak) "विश्वशांतीचे कार्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपले परिसर शांत ठेवावे लागतील. आपापसांतील भेद विसरण्याची गरज असून राष्ट्रीय एकता आवश्यक आहे. हिंदू समाजाची एकता संघाचे जीवनव्रत आहे. जगाच्या विकासासाठी हिंदू एकता महत्त्वाची आहे, कारण ती लोककल्याणासाठी आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले.
हे वाचलंत का? : मराठी भाषा आता ऑक्सफर्ड विद्यापिठात शिकवली जाणार!|
मथुरेच्या गऊ ग्राम परखम येथील दीनदयाल उपाध्याय गौ विज्ञान आणि संशोधन केंद्राच्या नवधा सभागृहात शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी संघाच्या दोन दिवसीय अखिल भारतीय कार्यकारी मंडल बैठकीचा समारोप झाला. यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत दत्तात्रेय होसबळे यांनी बैठकीत झालेल्या विषयांची माहिती दिली. पत्रकार परिषदेला अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर देखील उपस्थित होते.
दत्तात्रेय होसबळे यावेळी म्हणाले, "बैठकीत मुख्यतः संघशताब्दी वर्षाला अनुसरून पंचपरिवर्तनाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. समाजपरिवर्तन उपदेशाने होत नाही, ते स्वतःच्या आचरणाने घडते. त्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाला स्वतः पासून, स्वतःच्या कुटुंबापासून त्याची सुरुवात करावी लागेल. शाखास्तरावर त्या गोष्टी कराव्या लागतील. तेव्हाच समाजात त्या गोष्टी करताना, त्याच्या जनजागृतीचा नैतिक अधिकार मिळेल."
संघविस्ताराबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, सध्या ४५४११ स्थानांवर ७२३५४ शाखा सुरु असून त्यात ६६४५ शाखांच्या संख्येने वाढ झाली आहे. २९०८४ साप्ताहिक मिलन सुरू असून त्यांची संख्या ३१४७ ने वाढली आहे. ज्याठिकाणी शाखा लागत नाहीत अशी ठिकाणी संस्कार वर्ग, मासिक मिलन चालवले जातात. त्यांची संख्या ११३८२ असून त्यात ७५० ने वाढ झाली आहे. म्हणजेच एकूण १०१४३८ स्थानांवर कार्य सुरु झाले आहे, जी शताब्दी वर्षाच्या दृष्टीने अपेक्षित आकडेवारी आहेत.
संघ स्वयंसेवकांचे मदतकार्य...
पश्चिम बंगालमध्ये जुलै महिन्यात ताडकेश्वर नदीला पूर आला होता. यावेळी २५ हजार कुटुंबांकरीता संघ स्वयंसेवकांनी मदतकार्य केले आहे. ओडिया येथे निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती दरम्यान ४० हजार परिवारांना संघाने मदत पोहोचवली आहे. नुकत्याच ओडिसात आलेल्या 'दाना' चक्रीवादळादरम्यान येथील एकूण २० खंडांमध्ये १००० स्वयंसेवकांचे मदतकार्य सुरु होते. वायनाड येथे झालेल्या भूस्खलनादरम्यान हजारो स्वयंसेवकांचा गट मदतकार्यात गुंतला होता. त्याचप्रमाणे गुजरातच्या वडोदरा येथे आलेल्या पूरावेळी ८१ वस्त्यांमध्ये मदतकार्य केले होते.
बांगलेदेशातील हिंदूंनी पलायन करू नये.
बांगलादेशात निर्माण झालेली हिंदू विरोधी परिस्थीती पाहता बांगलेदेशातील हिंदूंनी पलायन न करता तिथेच संघटित होऊन खंबीरपणे आव्हानांचा सामना करण्याची आवश्यकता आहे. बांगलादेश भारतापासून विभाजित झाला असला तरी, बांगलादेश ही येथील हिंदूंची सुद्धा भूमी आहे. इतिहासातही तशा नोंदी आहेत. तिथल्या हिंदूंच्या रक्षणासाठी योग्य व्यवस्था तयार व्हायला हवी.