‘शारदा ज्ञानपीठम्’चे संस्थापक आणि ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक, लेखक, पत्रकार पंडित वसंतराव गाडगीळ यांचे १८ ऑक्टोबर रोजी पुण्यात वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी गाडगीळ यांनी अवघे आयुष्य समर्पित केले होते. प्राचीन संस्कृत ग्रंथांसह, वेद, उपनिषदांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत अध्यापन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, ‘शारदा’ संस्कृत मासिक, असे संस्कृतच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण असेच. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली ही शब्दसुमनांजली...
छातीपर्यंत रुळणारी पांढरी दाढी, तसेच केस, रुद्राक्षाच्या माळा, नजर स्थिर आणि तोंड उघडले की, त्यातून संस्कृत वैखरीचे (दर्शन?) श्रवण, डोक्यात अनेक कल्पना, भविष्यवेधी उपक्रमांची जंत्रीच आणि भूतकाळातील अनेक घडमोडींचे तपशीलवार स्मरण - पं. वसंत गाडगीळ या नावाच्या ऋषीचे हे वर्णन!
वेदांचा अभ्यासच नाही, तर मंत्रही मुखोद्गत, पुराणांचा अभ्यास, अभिजात संस्कृत वाङ्मय तर जणू मुखोद्गत, धर्मशास्त्राचे परिशीलन याचबरोबर पत्रकाराचा पिंड असल्याने आजूबाजूच्याच नाही, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे बारकाईने ज्ञान, प्रसन्न लेखन आणि अमोघ वक्तृत्व हे सर्व एकाच ठिकाणी बघायला मिळत असे पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वात!
संस्कृत हे पंडित जीवनाचे आलंबन होते. आधी ते संस्कृतला धरून बसले, नंतर संस्कृतच त्यांना धरून बसले. त्यांच्याच भाषेत ‘ओत्तमश्वासं यावत्’ (अखेरच्या श्वासापर्यंत) त्यांचा श्वास आणि ध्यास, संस्कृत होता. त्यामुळे संस्कृतमध्येच बोलणे, संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन, संस्कृतविषयक संगोष्ठींचे आयोजन, विविध ठिकाणच्या संस्कृत विद्वानांची ये-जा या आणि अशा अनेक संस्कृत गोष्टींमुळे असे वाटायचे की, यांना संस्कृतबाहेर काही जगच नसावे! संस्कृतविषयक अनेक योजना अथवा उपक्रम त्यांच्या डोक्यात सतत चालू असत. संधी मिळायचा अवकाश की, लगेच ते प्रत्यक्षात येत! उदा. रामरक्षेतील ’शिरो मे राघवः पातु’ हे कवच किंवा रक्षा स्तोत्र. ते सचित्र छापून, त्याच्या प्रती काढून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून ते फार प्रयत्नशील होते. कित्येक कार्यक्रमांत मंचावर एकदम अवतीर्ण होऊन सभेतील सर्व लोकांकडून त्यांनी हे म्हणून घेतले आहे. एखाद्या लग्नप्रसंगी वधू-वरांची नावे घातलेला लग्नाचा संक्षिप्त प्रयोग, लग्नाला आलेल्या सर्वांना वाटावा असा त्यांचा आग्रह असे. त्याचे प्रारूप त्यांनी करून ठेवले होते. मृत्यूत्तर क्रियाकर्मांच्या विधींचा असाच एक संक्षिप्त प्रयोग त्याच्या मौलिक माहितीसह त्यांनी तयार केला होता. यामागे आपल्या धार्मिक विधींची लोकांना माहिती करून द्यावी, अशी त्यांची तळमळ होती. पुणे महानगरपालिकेचा ‘संस्कृत शाळा’ असा फक्त शनिवारी-रविवारी चालणारा उपक्रम होता. उपक्रमाची पहिली बैठक होत नाही, तोच गाडगीळांनी त्याच्या पाठ्यपुस्तकाचा आराखडा तयार करून तो छापायलाही दिला होता. ‘शांकर सेवा समिती’ने फार मोठ्या विरोधाला तोंड देऊन महिला पौरोहित्य सुरू केले, तेव्हा ‘शांकर सेवा समिती’च्या पाठीशी पंडितजी उभे होते. गणपतीच्या दिवसात हजारो महिला अथर्वशीर्षाचे पारायण करतात, याचे त्यांना किती कौतुक!
पंडितजींच्या घरातील दोनच ठिकाणी पुस्तके नव्हती, एक म्हणजे संगणकासमोरची सुधाताई बसायच्या ती खुर्ची आणि दुसरे ठिकाण म्हणजे, स्वयंपाकाच्या ओट्यावरील गॅसस्टोव्हच्या आसपासची जाग. बाकी ते पुस्तकांच्या घरात राहात होते. पहाटे ३-३.३०ला उठायचे आणि एकेक एकेक जुना गठ्ठा काढून वाचायचे. ६-६.१५ला मग फोन करून महत्त्वाचे सापडले ते कळवायचे. १९४१, १९५१ इ. सालातले जुने संदर्भ ते ताज्या घडामोडींसारखे सांगायचे. त्याचे हे रहस्य होते. रोज भल्या पहाटे ते जुनी वर्तमानपत्रे वाचीत होते. त्यांच्याकडे खूप पुस्तके, पुस्तिका, कात्रणे, ग्रंथ, माहितीपत्रके इ. जिकडे-तिकडे ठासून कोंदून भरली होती. पण, खूप काही जुने हवे असेल, तेव्हा त्यांना ते नेमके सापडायचे. आश्चर्य वाटायचे मला. पण, त्यांचा आणि पुस्तकांचा जैविक म्हणा, प्रेमाचा म्हणा अथवा अंतरीचा म्हणा असा संबंध होता हेच खरे.
पण, तरीही ते नुसते ‘पुस्तकपंडित’ नव्हते. धर्मशास्त्र आणि कर्मकांड हा विषय त्यांना त्याच्या मर्मांसकट माहिती होता. एक-दोन प्रसंगी तर त्यांनी अगदी धाडसी म्हणावेत असे निर्णय दिले होते. माझी आई नेहमी म्हणायची की, ‘आता नवीन स्मृती लिहायची वेळ आली आहे आणि ती तुझे गाडगीळच लिहू शकतील.’ धर्मशास्त्राचा उभा, आडवा सणंग त्यांच्या डोळ्यांपुढे होता. समाजाच्या किंवा काळाच्या बदलत्या रेट्याची उत्तम जाणीव होती. काय बदलले पाहिजे आणि किती बदलले पाहिजे, याचा त्यांना अंदाज होता आणि समाजासाठी काही करायला पाहिजे, ही तर त्यांची प्रतिज्ञाच होती, या अशा प्रकारची व्यक्ती विरळाच!
प्रकाशनाच्या क्षेत्रातही त्यांनी अनेकानेक नवीन प्रयोग केले. ‘शारदा पत्रिका’ तर प्रसिद्धच आहे. ते ती पत्रिका अक्षरशः एकहाती चालवीत होते. संस्कृत पत्रिकांच्या इतिहासात ‘शारदा पत्रिके’चे योगदान फार मोठे आहे. इंटरनेटवर उपलब्ध असणारी ही पहिली पत्रिका. गाणी, गोष्टी, कविता, लेख काहीही ते तितक्याच सहजपणे आणि समर्थपणे लिहीत. खरोखर त्यांची लेखणी फार लवचिक होती. ‘शारदागौरव ग्रंथमाले’द्वारा तीन संस्कृत महाकव्ये त्यांनी प्रकाशित केली. डॉ. श्री. वर्णेकरांचे ‘शिवराज्योदयम्’, डॉ. ग. बा. पळसुले यांचे ‘वैनायकम्’ आणि डॉ. प्र. शं. जोशी यांचे ‘भीमायनम्.’ या सगळ्यांना फार मोठे मान-सन्मान व पुरस्कार लाभले. त्यांची भूमिका व्यावसायिक प्रकाशकाची नव्हती, तर त्या-त्या कवीच्या बरोबरीने ते त्या रचनांवर लक्ष देत मुद्रितें तर, दहा दहा, बारा बारा काढल्याचे मी पाहिले आहे. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांचे श्री दुर्गादास उपाध्ये यांनी केलेले ‘नामभागवतम्’ हे भाषांतरही उपाध्ये गुरूजींच्या बरोबरीने कष्ट घेऊन त्यांनी प्रकाशित केले. ‘जागतिक संस्कृत परिषदां’च्या प्रसंगी ते परिषदेचे पाचही दिवस शारदेचे दैनिक काढायचे. फारसं माणूसबळ नाही, सर्व काम अनोळखी, परक्या देशात, अनेक परवानग्यांचे अडथळे, पैशांची जुळवाजुळव या सगळ्यांवर मात करुन ते ‘जागतिक संस्कृत परिषद’ ज्या देशात असेल, तिथे जाऊन पाच-पाच दिवस दैनिक छापत होते. तेच वार्ताहर, तेच लेखक, तेच संपादक, डीटीपी लेआऊट सुधाताई बघायच्या. पण, ते सुद्धा स्वतःच्या मनासारखे होईपर्यंत करायला लावायचे. पुढे वितरणही तेच करायचे. एकटे!!! ‘क्रिया-सिद्धि: सत्त्वे वसति महतां नोपकरणे।’ (थोर माणसांच्या बाबतीत त्यांच्या संकल्पाची सिद्धी त्यांच्या अंगभूत ‘सत्त्वा’तअसते, बाह्य साधनसामग्रीवर नाही) हे सुभाषित त्यांच्याबाबतीत अगदी शब्दशः खरे होते.
ऋषिपंचमीचा सप्तऋषी व अरूंधती हा पूजनाचा उपक्रम हा त्यांचा एक अभिनव उपक्रम होता. समाजातील विविध क्षेत्रांत आजीवन समर्पित बुद्धीने केलेले आणि नव्वदीनंतरही कृतिशील असणारे महानुभाव ते बरोबर शोधून काढायचे. असे सात ऋषी आणि अशाचप्रकारे एखाद्या कार्याला जीवन वाहून घेतलेली कुणी महिला यांच्या पूजनाने ते कित्येक वर्षे ऋषिपंचमी साजरी करीत होते. सुरूवातीला त्यांना बरीच जुळवाजुळव करायला लागली. पण, पुढे-पुढे इतक्या संस्था या उपक्रमात आनंदाने व आत्मप्रेरणेने सहभागी झाल्या की, त्यांनी ऋषींना दिलेल्या भेटवस्तू ठेवायला मोठाल्या थैल्याही अपुर्या पडू लागल्या. ते म्हणायचे, एखादा धनिक हे एवढे सगळे सहज करू शकेल. पण, अशाप्रकारच्या कार्यक्रमात लोकसहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे हे ऋषी नुसते पूजनीय राहात नाहीत, तर प्रेरणास्थान बनतात.
अनेक संस्थांशी त्यांचा विविध नात्याने संबंध होता. आमच्या ‘वैदिक संशोधन मंडळा’ला तर जेव्हा-जेव्हा आर्थिक वा अन्य काही अडचण आली, तर मी हक्काने त्यांच्याकडे जात असे. बसल्या-बसल्या ते एक फोन फिरवायचे आणि सांगायचे “माझ्या या मुलीला काही अडचण आहे, तिची सोडवणूक करा!” आणि माझी अडचण निवारली जायची. माझ्यासाठी तर त्यांनी फार केले. मला संस्कृतमध्ये लिहिते-बोलते तर केलेच, पण संस्थेचे काम करताना ते पुढे नेण्याच्या दृष्टीने अनेक मौलिक सूचना वेळोवेळी दिल्या. त्यापैकी आयुष्यभर सांभाळावी व अमलात आणावीच अशी एक म्हणजे, एक सुभाषित - ‘अपमानं पुरत: कृत्वा मानं कृत्वा तु पृष्ठत:। कर्तव्यमाचरेत् प्राज्ञ: कार्यध्वंसो हि मूर्खता॥ (अपमान झाला, पुढे ढकलावा, मानसन्मान झाला पाठीमागे टाकावा आणि शहाण्या माणसाने आपले कर्तव्य करीत राहावे. मानापमानाच्या जंजाळात जर आपण अडकलो आणि हाती घेतलेले कार्यच रखडले किंवा पूर्ण नष्टच झाले, तर त्याच्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही.) त्यांनी स्वत: आयुष्यभर हे सूत्र सांभाळले.
बोलायची त्यांना खूप हौसच नव्हे, तर व्यसन होते. त्यांचे प्रसन्न पण प्रगल्भ संस्कृत ऐकतच राहावे असे होते. मी त्यांना ‘शुश्रूषेण्या वाक’ असे गमतीने म्हणायचे, म्हणजे ‘ऐकतच राहावी अशी वाणी!’ ते हसायचे. एका प्रसंगी बरे नव्हते, कणकण होती, दम लागत होता, तरी नका बोलू म्हटले, तरी माईक हातात घेऊन बोललेच. मग मी थोडी रागवले. मी त्यांना म्हटले, “मोठी-मोठी लोक तुम्हाला गौरवोपाधी देतात. मी पण आता देते.”
“कोणती?”
“माईकसूर!” हसले. परत स्टेजवर गेले. काही सांगायचे राहिलं होतं वाटतं. म्हणाले, “माझी मुलगी, मला ‘माईकासूर’ म्हणतीये, पण मी बोलणार आहे!”
संस्कृतविद्वान खूप झाले आहेत आणि होतीलही. पण, संस्कृतवर प्रेम करणारा, लोकांचा लळा असणारा आणि वैखरीचा उपासक असा ‘यासम हाच!’
आता?
‘वसंतवैभवं शान्तं मूकीभवति संस्कृतम्’
(लेखिका वैदिक संशोधन मंडळ (आदर्श संस्कृत शोध संस्था), पुणेच्या माजी संचालक,
आहेत.)
भाग्यलता पाटसकर