उद्या वसुबारसेपासून प्रकाशाच्या...रोषणाईच्या...झगमगाटाच्या दीपोत्सवाला प्रारंभ होईल. पुढील काही दिवस अवघा आसमंत दिव्यांच्या तेजाने अक्षरश: दिपून जाईल. सोबतच रुचकर फराळ, नातेवाईक, मित्रपरिवारांच्या भेटीगाठी असे एकूणच या दीपोत्सवातील चैतन्यमयी वातावरण. अशा प्रथा-परंपरा, संस्कार-संस्कृती यांना एका बंधनात गुंफणार्या या दीपोत्सवाच्या निमित्ताने....
गेला दसरा, पुढे दिवाळी
प्रकाश उत्सव मोठा
दिव्या दिव्यांची, ज्योत सांगते,
ना तेजाला तोटा...
समाज पारावर जोरदार तयारी सुरू झाली आहे. आता चाहूल लागली आहे दिवाळी सणाची. दिवाळी, ज्याला ‘दीपावली’ असेही म्हटले जाते, हा सर्वात महत्त्वाचा आणि आनंददायी सण. प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो आणि अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर, ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय, अशा अर्थाने त्याचे स्वागत केले जाते.
समाज पारावर दिवाळीची धमाल धामधूम सुरू झाली आहे. घरांघरात साफसफाई करून घरातील सर्व कानेकोपरे साफ होत आहेत. आपापल्या मोटारसायकलही स्वच्छ धुतल्या जात आहेत. घराची स्वच्छता, रंगरंगोटी सुरू आहे. स्वच्छ घरात नेहमी देवी लक्ष्मीचा सहवास असतो. या भावनेने घर चकाचक केले जाते. दारात रांगोळ्या काढल्या जातील, ज्यामुळे घराचे सौंदर्य द्विगुणित होईल. घरे आणि रस्ते दिव्यांनी सजवले जात आहेत. या दिवसात सगळीकडे अगदी प्रकाशच प्रकाश दिसत असतो.
दिवाळी किंवा दीपावली हा सण समाजात सामाजिक आणि सांस्कृतिक एकता निर्माण करणारा सण मानला जातो. या सणाच्या निमित्ताने सर्व जण एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आनंद साजरा करतात. विविध धर्म आणि जातीच्या लोकांमध्ये बंधुता वाढवण्याचे काम हा सण वर्षानुवर्षे करत आला आहे. या सणाच्या निमित्ताने लोक आपले भेदभाव विसरून एकत्र येतात आणि एकमेकांशी स्नेहभाव वाढवतात. कुलधर्म, कुलाचार, रितीरिवाज जपत, शेजारधर्म जोपासत हा सण साजरा केला जातो.
देशातील अर्थव्यवस्थेवरही हा सण सकारात्मक परिणाम दर्शवितो. या सणाच्या निमित्ताने खरेदी-विक्रीचा व्याप वाढतो. लोक नवीन कपडे, दागिने, घरगुती वस्तू आणि भेटवस्तू खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. अनेक उद्योग, व्यापार आणि लघु उद्योजकांची समाधानकारक उलाढाल,(खरी दिवाळी) समृद्धी आणि संपत्तीचा आनंदोत्सव धुमधडाक्यात साजरा करते.
हा सण कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करताना या सणाच्या निमित्ताने दूर राहणारे नातेवाईक आणि मित्र परिवार एकत्र येतो. एकत्र येऊन सण साजरा केल्याने आपुलकी वाढते. कौटुंबिक वातावरण हसते खेळते राहाते. नात्यानात्यात स्नेहभाव वाढतो. कुटुंबातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या सणात मोठ्या आनंदाने सहभागी होतात.
दिवाळी हा सण केवळ प्रकाशाचा सण नसून, तो अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. या सणाच्या निमित्ताने लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक एकता वाढते. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारा, संस्कृतीची जपणूक करणारा, कौटुंबिक, सामाजिक सलोखा जपणारा हा सण आहे. हा सण-साजरा करताना आपले जीवन अधिक प्रकाशमय, आनंदमय आणि समृद्ध होते, हे वास्तव आहे.
प्राचीन काळी दिवाळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जाणारा हा सण. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून आपण सर्वजण हा दीपोत्सव साजरा करतो. यंदाची दिवाळी दि. २८ ऑक्टोबर ते दि.२ नोव्हेंबर रोजीच्या या कालावधीत संपन्न होत आहे. हे सहा दिवस धार्मिक समारंभ, भव्य मेजवानी आणि आनंद मेळाव्याने सालंकृत असतील.
दिवाळी, ज्याला दिव्यांचा संच हा भारतातील सर्वात मोठ्या कारणास्तव म्हणतात. हा आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक नूतनीकरणाचे सार मूर्त रूप देतो. सहा दिवस आनंदाच्या ज्ञानात, दिवाळी हा वाईट मार्गाचा, अंधाराचा आणि अज्ञानाचा विजय दाखवतो. सण-उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरूवात वसुबारस सणाने केली जाते.
आनंदाचा दीपोत्सव हा,
परंपरा रूजलेली
स्नान पहाटे, आठवणींचे,
मायेने फुललेली
किलबिलणारा, नाद बोलका,
निनादते रे वाणी,
हात पाठिशी, सदा असावा,
आशीर्वचने कानी.
दिवस पाडवा, बंध रेशमी,
सप्तपदी चा सेतू
नेत्रदिपांनी, पतीस औक्षण, सौभाग्याचा हेतू
कृपा अविरत, सदा राहावी,
पुजू लक्ष्मी माता
प्रकाश येवो, समृद्धीचा,
हे गुण वर्णन गाता.
भाऊबीजे,भेट अलौकिक,
भावा बहिणीसाठी
नाते जुळले, अंतरातूनी,
हात तयाचा पाठी
अश्विन वद्य एकादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया (भाऊबीज) या सात दिवसांत साजरा होणारा हा प्रकाशोत्सव रितीरिवाज, परंपरा, स्नेह, आनंद, काहूर, सुख, दुःख यांचे इंद्रधनुष्य मनामध्ये पेरून जातो. दीपावलीचे सात, सप्तरंगी दिवस कुटुंबासाठी असले, तरी दीपावलीनंतरचे चार दिवस मात्र स्वतःसाठी असतात.
स्वतःसाठी सवडीचे चार क्षण मिळताच जमेल तेवढे दिवाळी अंक मी वाचून काढतो. घरातले महिला मंडळ मात्र नवी खरेदी, पै पाहुणा, पाडवा, भाऊबीज ओवाळणी. घडलेला बिघडलेला फराळ यात व्यस्त राहाते.
दारातली इवलीशी पणती अंधार दूर केल्याचा जो आनंद देते तो आनंदच मनातल्या अंधःकाराला दूर करण्याचे वैचारिक मनोबल वाचनातून, आप्तेष्टांच्या गाठीभेटीतून, मित्रांच्या सहवासातून सामर्थ्य देतो. दीपावलीचे हे सात दिवस मनाला ताजतवाने करण्यासाठी प्रयत्नशील राहातात.
येणारा प्रत्येक क्षण हे प्रत्येकासाठी आव्हान असते आणि गेलेला प्रत्येक क्षण हे प्रत्येकासाठी आठवणीचे पाठबळ असते. दारातली इवलीशी पण, ती अंधार दूर केल्याचा जो आनंद देते, तो आनंदच मनातल्या अंधःकाराला दूर करण्याचे वैचारिक मनोबल वाचनातून, आप्तेष्टांच्या गाठीभेटीतून, मित्रांच्या सहवासातून सामर्थ्य देतो.
व्यक्ती घडली की, कुटुंब घडते. कुटुंब घडले की समाज घडतो. समाज घडला की, देश विकसित होतो. ही विचारांची आवली या चार दिवसात मनात तेवत राहाते आणि मनाला माणसे वाचायची, जपायची, सवय लागते. माणूस माणसाला आपलासा वाटण, एकमेकांच्या हृदयात स्नेहमैत्री जागृत ठेवण्याचे कार्य हे चार दिवस करतात.
या सात दिवसात मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. त्यांच्यासाठी कुटुंब सहल आयोजित केली की, मुल खुश होतात. अशावेळेस शाळेतून दिलेला गृहपाठ, प्रोजेक्ट, होमवर्क, मार्गदर्शन मुलांना देता येते. विचारांनी, स्वभाव दोषांनी अंतर राखून वावरणारे कुटुंब या चार दिवसात एकत्र आणता येते. कुटुंबासाठी दिलेल्या वेळ हे चार दिवस सत्कारणी लावतात आणि खरी दिवाळी साजरी होते.
बालपणीची दिवाळी शिस्तीत, संस्कारात आणि वडीलधार्यांच्या अमाप प्रेमात सरली. वडिलधार्यांचा ओरडा हा देखील प्रेमाचा एक भाग असायचा. रूसवे, फुगवे, मनधरणी आणि दुसर्याच्या आनंदासाठी स्वतःच्या मनाला घातलेली मुरड यात दीपावलीचा नंदादीप निरंतर तेजाळत राहायचा. फटाके, फराळ आणि फटके आणि पटफजीती हे दिवाळीचे चार कोपरे. या चार कोपर्यातून दिवाळीत मनातले बालपण साद घालते. किल्ला करायला धावते. आठवणींचे मावळे रोज नवा इतिहास घडवतात. दिवाळी मुलांना आजोबांचे प्रेम देऊन जाते. मुले सुखावतात. मित्रमंडळी एकत्र येतात. आठवणींच्या रंगावल्या दिवाळी साजरी करतात. आठवणींच्या आरशात उजळणारी हीच स्नेहावली, आता नकळत बोलून जाते.
अशी दिवाळी, स्नेहवर्धिनी,
आनंदाची गाथा
सण तेजाचा, मनात ठसला,
लीन जाहला माथा
चला तर मग करूया स्वागत, रमा एकादशी, वसुबारस, धनतेरस, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सणावलीचे...
सणांचा राजा असलेला दीपोत्सव समाज पारावर दाखल झालाय.
लाव अंतरात दिवा
आली दिवाळी दारात
काळजाची तेलवात
आला प्रकाश घरात...!
विजय सातपुते