महायूतीने एकत्र येऊन अमित ठाकरेंना समर्थन द्यावं : आशिष शेलार

    26-Oct-2024
Total Views |
 
Ashish Shelar
 
मुंबई : आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील तर महायूतीने एकत्र येऊन त्यांना समर्थन द्यायला हवे, असे वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी माध्यमांशी संवाद साधला.
 
आशिष शेलार म्हणाले की, "महायूतीने अमित ठाकरेंना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत चर्चा करेन. महायूतीमध्ये एक नातं आपण जपलं पाहिजे, असे मला वाटते. हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणाऱ्या राज ठाकरेंचे चिरंजीव निवडणूकीच्या मैदानात उतरले असतील तर आपणही नाते जपायला हवे. भलेही उद्धव ठाकरेंना वाटत नसले तरी महायूतीने नाते जपावे. सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण महायूती म्हणून आपण सर्वांनी हा निर्णय घ्यायला हवा," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  विदर्भासाठी आग्रही असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेची विदर्भात ताकद किती?
 
माहिममध्ये तिरंगी लढत!
 
अमित ठाकरे हे माहिम विधानसभेतून यंदा पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि उबाठा गटाचे महेश सावंत यांचे आव्हान आहे. मात्र, आता आशिष शेलारांच्या वक्तव्यामुळे महायूती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.