बिश्नोईवर १० लाखाचा इनाम! एनआयएच्या 'मोस्ट वॉनटेड' यादीत नाव

    25-Oct-2024
Total Views |

bishoi
 
नवी दिल्ली : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, बिश्नोई गँग उजेडात आली. सलमान खानला दिलेली धमकी, भारतभर गँगचं पसरलेलं जाळं यामुळे बिश्नोई गँग सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. अशातच, या गुन्हेगारांच्या टोळीवर अंकुश ठेवण्याची योजना सुरक्षा दलाने आखली आहे. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने अन्मोल बिश्नोई वर १० लाखाचे इनाम जारी केले आहे. सध्या तो कॅनडामध्ये राहत असल्याची माहिती मिळाली असून, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमधील प्रमुख आरोपी आहे.

कोण आहे अन्मोल बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ असलेला अन्मोल, आपल्या भावा प्रमाणेच अवैध कामांमध्ये गुंतलेला आहे. अन्मोलने नेपाळला जाऊन बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. २०१५ साली स्व:ताची गँग तयार केली. जेल मधून बाहेर आल्यावर अन्मोलने आपल्या गुन्हेगारी कारवायांची सुरूवात केली. अन्मोल याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले गेले आहेत. मुक्तसर मध्ये खंडणीच्या प्रकरणात अन्मोल आरोपी आहे. पंजाबचा सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्या खूनात सुद्धा त्याचा हात होता. सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबाराचे नियोजन सुद्धा अन्मोलनेच केले होते. त्याच सोबत बाबा सिद्दीकीच्या हत्येमागे सुद्धा त्याचा हात होता. कोट्यावधी रूपयांची मालमत्ता असलेला बिश्नोई, सध्या कॅनडामध्ये दबा धरून बसल्याची माहिती मिळाली आहे.

बाबा सिद्दीकीच्या खूनात सहभाग
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारे आरोपी अन्मोलशी संपर्कात होते. पुण्याचा प्रवीण लोणकर सुद्धा या कटात सामील होता. स्नॅपचॅटच्या माध्यमातून अन्मोल सोबत त्यांचा संवाद होत असे. स्नॅपचॅट वर बाबा आणि झिशान सिद्दीकी यांचे फोटो पाठवतच ओळख पटवून देण्याचे काम केले गेले होते.
अन्मोल बिश्नोई या वर्षी केनिया मध्ये काही काळ वास्तव्यास होता. त्यानंतर तो कॅनडाला गेला असून आता एनआयएच्या हिटलिस्ट वर आहे.