का आली आयफोन १६ वर इंडोनेशियात बंदी?

    25-Oct-2024
Total Views |

iphone 16
 
मुंबई : ( Apple iPhone 16 banned in Indonesia ) इंडोनेशियाने 'ॲपल'च्या आयफोन १६ च्या देशाअंतर्गत विक्रीस बंदी घातली आहे. इंडोनेशिया सरकारच्या या खळबळजनक निर्णयामुळे कंपनीला मोठा धक्का बसला आहे.
 
इंडोनेशियाचे उद्योग मंत्री अगुस गुमिवांग कार्तासस्मिता यांनी मंगळवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात घोषणा केली असून, विक्रीच्या बंदीसोबतच नागरिकांनी हे डिव्हाइस परदेशातून खरेदी करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही दिला आहे. जर असे आढळल्यास सरकारला त्याची माहिती द्यावी, असे जनतेला आवाहनदेखील केले आहे.
 
इंडोनेशिया सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामागील कारण स्पष्ट झाले आहे.'ॲपल' कंपनीने इंडोनेशियामधील गुंतवणुकीसाठी काही अटी व ठराविक रकमेची गुंतवणूक या गोष्टी मान्य केल्या होत्या, परंतु हे गुंतवणूकीचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.
 
कंपनीने १.७१ ट्रिलियन रुपियापैकी १.४८ ट्रिलियन रुपिया (९५ दशलक्ष डॉलर्स) ची गुंतवणूक केली आहे, जी एकूण ठराविक रकमेपेक्षा कमी आहे. याबरोबरच “ॲपलचा आयफोन १६ सध्या इंडोनेशियामध्ये विकण्यास परवानगी नाही, कारण TKDN प्रमाणपत्राचा विस्तार अद्याप प्रलंबित आहे, तसेच कंपनीकडून पुढील गुंतवणुकीची प्रतीक्षा आहे,” असे उद्योग मंत्र्यांनी सांगितले.
TKDN प्रमाणपत्रासाठी कंपन्यांनी इंडोनेशियामध्ये त्यांची उत्पादने विकण्यासाठी ४०% स्थानिक सामग्री मूल्याची आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.
 
ॲपल कंपनी इंडोनेशियामध्ये संशोधन आणि विकासासाठी सुविधांची पूर्तता करण्याचा विचार करत आहे, यासंदर्भातील माहिती ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली होती. त्यांनी जकार्ता येथे झालेल्या बैठकीत अध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी संभाव्य उत्पादन योजनांवर चर्चा केली होती.