मिरा भाईंदरमध्ये मविआ आघाडीत फूट

मीरा भाईंदर मतदार संघात अपक्षांची भरमार

    25-Oct-2024
Total Views |

Mahavikas Aghadi
ठाणे : मविआ आघाडीत (Mahavikas Aghadi) आलबेल असल्याचे वरकरणी दिसत असले तरी मिरा भाईंदरमध्येही आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. मिरा भाईंदरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक हंसकुमार पांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि प्रदेश सदस्या सुध्दा अपक्ष निवडणूक लढवत असल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, मिरा भाईंदर मध्ये अपक्षांची भरमार झाली असुन २५ ऑक्टो. पर्यंत या मतदार संघात २८ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली.
 
मिरा भाईंदर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक हंसकुमार पांडे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर तोफ डागली होती. २००४ पासुन काँग्रेसने संधी न दिल्याची खंत व्यक्त करून निवडणूक लढविण्याचा इरादा स्पष्ट केला होता. तर शुक्रवारी शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसचे रविंद्र खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण कदम, रमझान खत्री, डॉ आसिफ शेख आणि महिला जिल्हाध्यक्षा फ्रीडा मोराईस हे सुध्दा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर भाजपचे नरेंद्र मेहता, सुमन मेहता, सज्जी आय. पी., सुरेश खंडेलवाल, रवी व्यास, ओमप्रकाश अगरवाल, गीता जैन यांनी देखील अपक्ष अर्ज घेतले आहेत. तसेच, तब्बल २८ जणांनी अपक्ष अर्ज घेतले आहेत, त्यामुळे मीरा भाईंदर मतदार संघात अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
 
मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघात २२ ऑक्टो. ते २५ ऑक्टो. पर्यंत आतापर्यंत ४२ उमेदवारांनी ९१ अर्ज घेतले आहेत. यात शिवसेनेने ३, भाजप ७, राष्ट्रवादी २, तर मनसे आणि काँग्रेसने प्रत्येकी एकच अर्ज घेतला असुन तब्बल २८ अपक्षांनी अर्ज घेतले आहेत. अशी माहिती निवडणुक अधिकार्यांनी दिली.