निराकार सद्वस्तू

    24-Oct-2024
Total Views |

samarth ramdas swami 
 
निर्गुण निराकार असे परब्रह्मतत्व केवळ एकच एक असल्याने, त्याच्या सारखे दुसरे काहीही संभवत नाही. दुसर्‍या कशाशीही त्याची तुलना करता येत नाही. त्यामुळे अन्य वस्तूचे उदाहरण देऊन, या परब्रह्माचे वर्णन करता येत नाही, असे स्वामींनी स्पष्ट केले आहे.
 
परब्रह्म किंवा सद्वस्तू निराकार म्हणजे आकाररहित आहे. या जगात आकारयुक्त दृश्यवस्तूच पाहण्याची आपल्याला सवय झाल्याने, निराकार अशी कल्पना आपण करू शकत नाही. तसेच निराकाराचे वर्णनही करता येत नाही. दृश्यवस्तूबाबतचे गुणधर्म आणि नियम, निराकाराला लावता येत नाहीत. आपला व्यवहारातील अनुभव असा की, आपण सभोवतालच्या दृश्यवस्तू त्यांच्या आकारावरून, गुणांवरून आणि उपयुक्ततेवरून ओळखत असतो. सर्व दृश्यवस्तूंना विशिष्ट आकार असल्याने, आपण त्या वस्तूचे वर्णन करू शकतो. आकार ही त्या वस्तूला ओळखण्याची खूण आहे. व्यवहारातील एक साधे उदाहरण घेऊन हे अधिक स्पष्ट करता येईल. छत्री ही एक नित्य वापराची वस्तू आहे. तिला विशिष्ट आकार आहे. गुणधर्मामध्ये रंग आहे, उपयुक्तता आहे. छत्रीचे वर्णन करायचे झाले, तर या छत्रीला मधोमध एक दांडा असतो. दांडा धरता यावा म्हणून त्यावर विशिष्ट आकाराची मूठ असते. या दांड्यावर अर्धवर्तुळाकार धातूच्या अथवा प्लॉस्टकच्या काड्या असून, त्यावर कापड अथवा तद्सदृश आवरण गुंडाळलेले असते. ते काळ्या अथवा इतर कोणत्याही रंगाचे असू शकते. तिच्या घुमटाकार आकारामुळे, आपले उन्हापासून अथवा पावसापासून संरक्षण होते. जगातील सर्व दृश्य वस्तूंना आकार, रंग, गुण असल्याने, त्यांचे वर्णन शब्दांत करता येते. परंतु, परब्रह्म म्हणजे सद्वस्तू निराकार असल्याने, आपली कल्पनाशक्ती अपुरी पडते. तसेच, त्याच्या निर्गुणत्वाने त्याचे वर्णनही करता येत नाही. वस्तूतः परमात्मवस्तू सगुण आणि निर्गुण या दोहोंच्याही पलीकडे असणारी सद्वस्तू आहे. त्या सद्वस्तूत चैतन्याचा साठा ओतप्रोत भरला आहे. त्या चैतन्यसाठ्यातून आवश्यक तेवढी शक्ती आणि आवश्यक ते रूप घेऊन, विशिष्ट कार्यासाठी भगवंत या पृथ्वीतलावर अवताररूपात प्रगट होतो. मानवजातीतील आपले विशिष्ट कार्य पार पाडल्यावर, भगवंताची अवतारी शक्ती परत सद्वस्तूत विराम पावते.
 
या पृथ्वीतलावर अधर्माचे फार स्तोम माजल्यावर जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. या अवतारकार्यात प्रामुख्याने सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा, दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करुन, भगवंत धर्माची विस्कटलेली घडी सावरतो, त्यातून धर्माची प्रतिष्ठापना होते. (संदर्भ : भगवद्गीता अध्याय ४, श्लोक कमांक ७ व ८) अशी सर्व हिंदूंची श्रद्धा आहे. ब्रह्मादी देवांनासुद्धा निर्गुण निराकार चैतन्याने परिपूर्ण अशा सद्वस्तूूतून शक्ती व प्रेरणा घेऊन, आपले कार्य करावे लागते. ब्रह्मादी देवांना आपल्या कार्यासाठी सद्वस्तूूचा आधार असतो. हा विचार स्वामींनी सविस्तरपणे पुढील श्लोकात सांगितला आहे.
 
निराकार आधार ब्रह्मादिकांचा।
जया सांगता सीणली वेदवाचा।
विवेकें तदाकार होऊनि राहें।
मना संत आनंत शोधूनि पाहे॥१४८॥
 
परब्रह्माचे वर्णन शब्दांत करता येत नसले, तरी त्याची वैशिष्ट्ये सांगता येतात. परब्रह्माचे मुख्य वैशिष्ट म्हणजे, ते निर्गुण निराकार आहे. यासंबंधीचे विवेचन आपण यापूर्वी पाहिले आहे, परंतु ब्रह्मदेव आदी देवांना सगुण अवतारात सद्वस्तूच्या आधाराने आपले सृष्टीसंबंधीचे कार्य करता येते, आपली जबाबदारी पार पाडता येते. ब्रह्मदेव आदी देवांचे कार्य शास्त्रांतून पुढीलप्रमाणे सांगितले आहे- ब्रह्मदेव सृष्टीरचनेचे, त्यातील घटकनिर्मितीचे कार्य करीत असतो. विष्णू या सृष्टीचा प्रतिपाळ म्हणजे सांभाळ करतो, तर भगवान शंकराची भूमिका जीर्ण झालेल्या सृष्टीघटकांना दूर करून, नव्याने निर्माण होणार्‍या सृष्टीघटकांसाठी जागा निर्माण करणे अशी आहे. त्यामुळे महेशाला संहारकर्त्याची भूमिका बजावावी लागते. ब्रह्मदेवादी देवांना कार्ये सद्वस्तूच्या आधारावरच करता येतात. सृष्टीच्या बाबतीत ब्राह्मदेव, विष्णू, महादेव यांची कार्ये महान असली तरी, त्यांना सद्वस्तूूचा दर्जा देता येईल का? याबाबत स्वामीचे तर्कशास्त्र आपल्याला विचारात पाडते. स्वामी प्रश्न उपस्थित करतात की,
 
ब्रह्मयानें सकळ निर्मिले।
ब्रह्मायास कोणें निर्माण केलें।
विष्णुनें विश्व पाळिलें।
विष्णूस पाळिता कवणु॥
रुद्र विश्वसंहारकर्ता।
परी कोण रुद्रास संहारिता।
कोण काळाचा नियंता।
कळला पाहिजे॥ (दा. ९.५.२४ व २५)
 
थोडक्यात, ब्रह्मदेव, विष्णु, शंकर आणि काळ यांना सद्वस्तूच्या आधारावर चालावे लागते. सद्वस्तूतून म्हणजे परक्रमातून ते येतात, त्या चैतन्यावर आपली कार्ये करतात व परत परब्रह्मतत्वात विलीन होतात. या सर्वांचा आधार असलेल्या सद्वस्तूचे शब्दांत वर्णन करता येत नाही. वेदही परब्रह्माबद्दल बोलून थकून गेले. वेदांनाही त्याचे वर्णन करताना ‘हे नाही, ते नाही’ म्हणजे ‘नेति नेति’ असेच सांगावे लागले. जे वेदांनाही स्पष्ट शब्दांत सांगता आले नाही, ते आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना कसे समजेल? असा विचार मनात येईल. यासाठी स्वामी एक उपाय येथे सुचवीत आहेत. स्वामींचा विवेकावर पूर्ण विश्वास आहे. माणसाने सारासार विवेक बाळगून, आपली देहबुद्धी व आपला अहंकार बाजूला ठेवला, तर त्याला परब्रह्माशी तदाकार होता येईल. मुळात माझ्या ठिकाणी असलेले चैतन्य, त्या चैतन्याने भरून राहिलेल्या परब्रह्माचाच अंश असल्याने, त्याच्याशी तदाकार होता येईल. पाण्याच्या थेंबाला वेगळा आकार असला, तरी तो थेंब सागरावर पडल्यानंतर त्याला सागराचे रूप प्राप्त होते, तसे आपण ब्रह्मतत्वाशी तदाकार हावे, असे स्वामी सुचवतात. शास्त्रांत सांगितले आहे की, परमात्वतत्वातून आकाशाची निर्मिती होते. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती व त्यापासून मानवादी जीवसृष्टीची निर्मिती होते. पृथ्वीवरील चेतन, अचेतन वस्तूजात पंचमहाभूतांच्या मिश्रणातून तयार होतात. पंचमहाभूते, परब्रह्मतत्वाचा अविष्कार आहे. त्यामुळे विवेक बाळगून सद्वस्तू जाणल्याशिवाय, सृष्टीतत्वाचा उलगडा होत नाही. चेतन अचेतन सर्ववस्तूजात चैतन्याधिष्ठित असल्याने, अचेतन वस्तूतील चैतन्य संताना स्पष्टपणे दिसते. यासाठी त्या सद्वस्तू सोडून शोध घ्यावा आणि आपले जीवन सार्थकी लावावे, असे स्वामींनी मनाला सांगितले आहे. हे मना, कायम टिकणारे, ज्याला अंत नाही असे ‘संत आनंत’ परब्रह्मतत्व याचा विवेकाने शोध घे, त्यातच खरे समाधान आहे.
सुरेश जाखडी
७७३८७७८३२२