कर्नाटक आणि तेलंगणातून काँग्रेसने मागवला पैसा?

विधानसभेसाठी फंडिंग; दोन्ही राज्यांच्या सीमा सील करण्याची मागणी

    24-Oct-2024
Total Views |

kiran pavaskar
 
 
मुंबई : ( Congress ) “विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणामधील नेत्यांवर दिली असून तेथून शेकडो कोटी रुपये महाराष्ट्रात येतील,” अशी खळबळजनक माहिती शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी बुधवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी दिली. या दोन्ही राज्यांच्या सीमा सील करण्यासाठी निवडणूक आयोगाला निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले.
 
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पावसकर बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुकीत पैशांचा खेळ होईल. महाविकास आघाडीकडे कर्नाटक आणि तेलंगणातून नव्हे, तर परदेशातूनही पैसा येत आहे. या पैशाचीही चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत याच दोन राज्यांतून महाराष्ट्रात पैसा आला होता. याचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची सीमा सील करण्याची गरज आहे, असे पावसकर म्हणाले. “कुठेतरी छोटी रक्कम पकडल्याचे दाखवायचे आणि मोठे घबाड यांच्याच घरी पाठवायचे असा प्रकार सुरु आहे,” असे त्यांनी सांगितले.
 
राज ठाकरे यांनी आपले विचार सडेतोड मांडले. त्यांनी कधी राजकारणाचा, खुर्चीचा, पैशांचा विचार केला नाही. मागच्या निवडणुकीत पुतण्यासाठी वरळीत उमेदवार न देऊन राज यांनी नाते जपले. मात्र त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीत उभे राहिले असताना, त्याची परतफेड करण्याचे साधे सौजन्य उबाठाच्या प्रमुखामध्ये राहू नये, ही लाजिरवाणी बाब आहे. नाते जपले गेले नाही, नातेवाईक आणि भावांना जपले गेले नाही, मराठी माणसाला जपले गेले नाही आणि बाळासाहेबांच्या विचारांनाही उबाठाकडून जपले गेले नाही. कशाचीही फिकीर न करता फक्त खुर्ची आणि खुर्ची आणि मी मुख्यमंत्री कसा होईन आणि माझा मुलगा मंत्री कसा होईल. मी आणि माझे कुटुंब बाकी सगळे गेले तेल लावत, हा एकच प्रकार उबाठाकडून सुरु असल्याची खरमरीत टीका पावसकर यांनी केली.
 
दादर-माहीममध्ये मैत्रीपूर्ण नव्हे, कडवी लढत
 
“माहीम विधानसभेत सदा सरवणकर यांनी आमदार म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या भागात त्यांचा प्रभाव आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यासचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत मैत्रिपूर्ण नव्हे, तर लढत म्हणूनच होईल,” असे पावसकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मागील अडीच वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मतदान करा. पुढेही असेच काम सुरु राहील,” असे म्हटले आहे. “ज्यांनी १५ हजार कोटी कमावयचे असतील, त्यांना १ हजार, ५०० रुपयांचे काय मोल कळणार? पत्राचाळीत १०० कोटींचा घोटाळा करणार्‍यांना १ हजार, ५०० रुपयांचे महत्त्व नाही कळणार,” अशी टीका पावसकर यांनी केली.