मुंबई : हिंदी 'बिग बॉस १८' ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. आणि विशेष चर्चा ज्या स्पर्धकांविषयी सुरु होती ते म्हणजे वकिल गुणरत्न सदावर्ते. सदावर्ते यांनी त्यांच्या खास स्टाईलने बिग बॉसचं घर चांगलंच गाजवलं. त्या घरात केवळ दोन आठवडे मुक्काम करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी घरात बरेच गौप्यस्फोट केले, शिवाय घराबारहेर आल्यावरही त्यांची अनेक विधाने चर्चेत आहेत.
Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, " आम्ही जे बाहेर आहोत ते काल होतो, आज आहोत आणि तेच उद्या राहणार आहोत. बिग बॉसमधून मला तेवढ्या दिवसात बाहेर येणं आवश्यकच होतं. आपण न्यायालयाचे मनसुबे सुद्धा ओळखले असतील. आपण सर्व माध्यमांनी दाखवलं की महत्वाची केस आहे. झालं असं की, मी त्या तारखेला बाहेर यायचं असं अॅग्रीमेंटमध्ये होतं."
सदावर्ते पुढे म्हणाले, "दुसरी गोष्ट बिग बॉसच्या घरात काही प्रॉब्लेम होता का? तर तुम्ही सलमानशी बोलताना पण पाहिलं असेल की, तिकडचे कलाकार स्ट्रगलर आहेत. ती सर्व स्ट्रगल करणारी मंडळी आहेत. म्हणून मी त्यांना चांगलं असं नाव दिलं. उबले चने फ्यूचर हिरो. ते सर्व मला उबले चने फ्यूचर हिरो वाटायचे. त्या सर्व बिचाऱ्यांनी माझ्याकडून योगा शिकले. हनुमान चालिसाची बैठक कशी लावायची ते शिकले. किर्तन करायचं ते शिकले. त्यातल्या त्यात जेलचा संघर्ष कसा करावा या गोष्टीही ते शिकले. त्यांनाही माझ्यामुळे लोकशाही समजली. घरातील १७ जणांना माझ्याविषयी अनास्था होती असं बिलकूल नाही. कोणासाठी ते निव्वळ एंटरटेनमेंट होतं. माझ्यासारख्या सोशो-पॉलिटिकल कार्यकर्त्यासाठी ते काहीतरी वेगळं होतं. "