मुंबई : अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेल्या बऱ्याच काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ साली काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत असून काळवीटाची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानने त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. काळवीटची शिकार केल्यानंतर सलमानने बिश्नोई समाजाला पैशाची ऑफर दिल्याचा दावा त्याने केला आहे.
लॉरेन्सचा भाऊ रमेश बिश्नोईने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सलमानने बिश्नोई समाजाला पैसे ऑफर केले होते. पण, आम्ही ते घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, "सलमानचे वडील सलीम खान म्हणाले की लॉरेन्सची गँग पैशासाठी हे सगळं करत आहे. मी त्यांना याची आठवण करू देऊ इच्छितो की त्यांचा मुलगा बिश्नोई समाजाकडे चेक बुक घेऊन आला होता. जेवढे पैसे हवेत तेवढी अमाऊंट टाका, असं तो म्हणाला होता. जर आम्हाला पैसे हवे होते, तर आम्ही तेव्हाच घेतले असते".
पुढे तो म्हणाला की, “बिश्नोई समाज प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी स्वत:च्या जीवाचीही बाजी लावतात. त्यामुळे काळवीटची शिकार केल्याने बिश्नोई समाजाचं रक्त उसळलं होतं. जेव्हा सलमानने काळवीटची हत्या केली तेव्हा आमचं रक्त सळसळत होतं. पण, आम्ही याचा न्यायनिवाडा कोर्टावर सोडला. जर तुम्ही संपूर्ण समाजाची खिल्ली उडवत असाल तर समाजात नाराजी पसरणं स्वाभाविक आहे. म्हणूनच यासाठी बिश्नोई समाज लॉरेन्ससोबत आहे".
दरम्यान, लॉरेन्सकडून सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे सध्या सलमान खानची सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. तसेच, त्याने नुकतीच बुलेट प्रुफ गाडी देखील संरक्षणासाठी घेतली आहे.