टीव्ही पाहून सलमानच्या धमकीचा संदेश पाठवला; झारखंडमधून तरूणाला घेतलं ताब्यात

    24-Oct-2024
Total Views |

salman khan  
 
मुंबई : सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या वादामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. आणि त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर पुन्हा सलमान खानला जीवे मारण्याचा संदेश आला होता. दरम्यान, आता धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय तरूणाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचत वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती. आरोपीला मुंबईत आणून याप्रकरणी अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव हुसैन शेख (२४) असे असून तो झारखंड येथील जमशेदपूरमधील रहिवासी आहे. आरोपीने धमकीच्या संदेशात स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तो जवळचा असल्याचे सांगितले होते. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप मदत क्रमांकावर एक धमकीचा संदेश आला होता. त्यात लॉरेन्स बिश्नोईशी असलेले वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे ५ कोटीं मागणी करण्यात आली होती. जर पैसे दिले नाहीत, तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, असा इशारा थेट देण्यात आला होता. याप्रकरणी १७ ऑक्टोबरला वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
 
अखेर तपासाअंती संदेश पाठवणारा झारखंडमधील रहिवासी असल्याचे निष्पन्न होत त्याला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन वरळी पोलीस मुंबईत पोहोचले व आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.