विदेशी गुंतवणूकदारांचे जोरदार विक्री सत्र; तर दुसरीकडे निफ्टी आयटीत मोठी उसळी

23 Oct 2024 17:18:18
stock-market-closed-in-the-red-for-the-third
 
 
मुंबई :      भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली असून मागील काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्रीचा सपाटा सुरू आहे. सेन्सेक्स १३८.७४ अंकांच्या घसरणीसह ८०,०८१.९८ पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० देखील २४,४३५.५० च्या पातळीवर बंद झाला.


हे वाचलंत का? -     भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा वेग सर्वाधिक; सात टक्के वाढीचा आयएमएफचा अंदाज
 

दरम्यान, परकीय गुंतवणूकदारांचा चीनकडे वाढता कल, शेअर बाजारात एफपीआय गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री व मध्य-पूर्वेतील वाढता संघर्ष यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर, येत्या ५ नोव्हेंबरला अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीबाबत अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता होती. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

एकूणातच अस्थिरतेच्या वातावरणात आयटी सेक्टरने आपले मोठे नुकसान टाळल्याचे दिसून येत आहे. निफ्टी आयटीमध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून शेअर बाजारात आयटी आणि बँकिंग समभागांकडे जास्त ओढा राहिल्याने या क्षेत्रात मजबूत स्थिती निर्माण झाली. निफ्टी आयटीत २.३५ टक्के वाढ नोंदविली असली तरी बाजार घसरणीसह बंद झाला.

बजाज फायनान्सने ४.९५ टक्के वाढ नोंदविली तर टेक महिंद्रा, टीसीएस, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि कोटक बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले. एनबीएफसी कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. तर दुसरीकडे, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, एलअँडटी, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडियाचे समभाग १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.
 



Powered By Sangraha 9.0