ठाण्यात महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला

23 Oct 2024 15:31:15
 
sanjay kelkar
 
 
ठाणे : ( Sanjay Kelkar ) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय केळकर हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत वर्णी लागल्यानंतर आ. केळकर यांनी मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी चा मुहूर्त साधत प्रचाराचा श्रीगणेशा केला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाड्यातील घंटाळी देवी मंदिरात दर्शन घेऊन ‘घर चलो अभियाना’ला सुरूवात करण्यात आली.
 
आ. संजय केळकर यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख सुभाष काळे, स्थानिक माजी नगरसेवक सूनेश जोशी, परिवहन सदस्य विकास पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, विलास साठे, कैलास म्हात्रे, डॉ. राजेश मढवी, मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, प्रभाग अध्यक्ष रोहित गोसावी, बूथ प्रमुख, पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
 
‘घर चलो अभियान’ अंतर्गत ठाणे शहर मतदारसंघात घरोघरी पत्रके वाटून उमेदवार संजय केळकर यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत करून सोबत राहण्याचा विश्वास दिला. गेल्या दहा वर्षांत कार्यालयाचे दरवाजे सताड उघडे ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
 
नागरी विकास कामे, एसआरए प्रकल्प, रखडलेल्या जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, गॅस जोडणी, आरोग्य, शिक्षण आणि अन्य सोयी-सुविधा मार्गी लावून संजय केळकर यांनी नागरिकांना दिलासा दिल्याच्या प्रतिक्रिया विविध भागांतील नागरिकांनी दिल्या. “तर पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्या,” असे आवाहन आ. केळकर यांनी केले.
 
सकाळी हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाडा येथील घंटाळी मंदिरात अभियानाला सुरूवात करून पत्रके वाटण्यात आली. यानंतर खारटन रोड येथे रमाबाई चौक व वाल्मिकी मंदिर येथे दर्शन घेऊन महागिरी कोळीवाडा, खारटन रोड परिसरात पत्रके वाटण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक नम्रता कोळी, सुनील हंडोरे, जयेंद्र कोळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 
बाळकूम नाका, मनोरमा नगर, आझाद नगर, डोंगरी पाडा, धर्मवीर नगरमध्येही प्रचाराचा शुभारंभ झाला. राबोडी, आकाशगंगा, पंचगंगा, पाटील चौक येथे पत्रक वाटप करताना माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, मंडल अध्यक्ष दिलीप कंकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. गोकुळ नगर, गोकुळदास वाडी येथे माजी नगरसेवक कृष्णा पाटील, नंदा पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते. रायगड गल्ली, चंदनवाडी परिसरात माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक राऊळ, महेश कदम आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 
पहिल्याच दिवशी महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या ‘घर चलो अभियाना’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी बोलताना आ. केळकर यांनी नागरिकांचे आभार मानले. दररोज मी नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवून दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असतो. विविध लोकहिताचे उपक्रम राबवून हजारो नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे आ. केळकर म्हणाले.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0