माहिममधून अमित ठाकरे रिंगणात

23 Oct 2024 11:24:14
 
amit thackeray
 
 
मुंबई : ( MNS )महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.
 
मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह नव्या दमाच्या नेत्यांवर राज ठाकरे यांनी विश्वास दाखवतानाच वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बेलापूरमध्ये गजानन काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या डोंबिवली दौर्‍यात कल्याण ग्रामीणचे विद्यमान आ. राजू पाटील आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. दुसर्‍या यादीत त्यांनी कळवा-मुंब्रा येथून सुशांत सूर्यराव यांना शरद पवार गटाचे विद्यमान आ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मैदानात उतरविले आहे. यासोबतच राज्यातल्या इतर भागांमध्ये दि. आ. रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश यांना खडकवासला येथून उमेदवारी दिली आहे. भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्ये मनसेचे किशोर शिंदे आव्हान देतील. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार आणि भाजपच्या राम शिंदे यांच्यासमोर मनसेचे रवींद्र कोठारी हे असतील. तासगाव कवठे महाकाळ येथे मनसेचे वैभव कुलकर्णी हे आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना आव्हान देतील.
 
 
 
Powered By Sangraha 9.0