मुंबई, दि.२३ : रेल्वे या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना अद्यावत सोयीसुविधा पुरविण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच भाग म्हणून मध्य रेल्वेच्या ९८ स्थानकांचा पुनर्विकास करण्याची कामे हाती घेण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी तब्बल ५०१४.४१ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
'अमृत भारत स्टेशन योजना'(एबीएसएस)अंतर्गत, मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. ऑगस्ट २०२३ आणि फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ७६ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. या प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी मूळ निवड झालेल्या ७६ स्थानकांपैकी ७ स्थानकांच्या सॉफ्ट अपग्रेडेशनची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच समाविष्ट झालेल्या ३ स्थानकांसाठी (जळगाव, अक्कलकोट आणि पनवेल) प्राथमिक कामे हाती घेतली जात आहेत, जी चालू वर्षात मंजूर झाली आहेत.
मध्य रेल्वेमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर आणि अजनी या ३ स्थानकांवर मुख्य अद्ययावतीकरणचे काम सुरू आहे. या प्रकल्पांची एकूण भौतिक प्रगती अनुक्रमे ५%, ३२% आणि ३२% आहे. मध्य रेल्वेने प्रमुख अद्ययावतीकरणासाठी आणखी १६ स्थानके निवडली आहेत. यामध्ये दादर, ठाणे, ठाकुर्ली, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस-एलटीटी, लोणावळा, भुसावळ, अकोला, अमरावती, खंडवा, नाशिक रोड, वर्धा, पुणे, मिरज, शिवाजी नगर आणि साई नगर शिर्डी या स्थानकांचा समावेश आहे. याचे डीपीआर प्रगतीपथावर आहेत.
यामध्ये पुढील कामांचा समावेश आहे.
-इमारतींची आकर्षक रचना
-स्वच्छ आणि सुंदर स्थानके
- प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा
- कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा
- मार्गदर्शन आणि माहिती फलके
- पायाभूत सुविधांची उभारणी
- सर्वसमावेशक सुविधा
- "एक स्टेशन एक उत्पादन"ला चालना