मुंबई, दि.२३ : मुंबईवरुन पनवेलमार्गे लोकल ट्रेनने कर्जतला पोहोचण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. या रेल्वेमार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या बोगद्यांची कामे सध्या वेगात पूर्ण करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत या कॉरिडॉरचे ६०% काम पूर्ण झाले आहे. याशिवाय या मार्गावरील बोगद्यांमध्ये गिट्टी विरहित ट्रॅक टाकण्याचे कामही सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आले होते. पनवेल ते कर्जत दरम्यान २९.६ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग असून, त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे. या प्रकल्पासाठी २,७८२कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या कॉरिडॉरचे काम मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३ अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ मार्फत केले जात आहे.
तीन बोगद्यातून धावणार रेल्वे
उल्लेखनीय बाब म्हणजे, कर्जत-पनवेल दरम्यान बांधण्यात येत असलेल्या या रेल्वे मार्गात एकूण ३ बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या ३ बोगद्यांपैकी २ किमी लांबीचा वेव्हरली बोगदा पूर्ण झाला आहे. या बोगद्याची खास गोष्ट म्हणजे संपूर्ण मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील हा सर्वात लांब बोगदा आहे. कर्जत-पनवेल दरम्यानचा सध्याचा ट्रॅक माल आणि काही मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी वापरला जातो. मात्र नवीन दुहेरी मार्गिकेमुळे मुंबई ते कर्जत दरम्यान उपनगरीय लोकल रेल्वे गाड्या पनवेलमार्गे धावतील.
डिसेंबर २०२५ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प पूर्ण डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या बोगद्यांमध्ये गिट्टीविरहित ट्रॅक टाकण्याचे काम सुरू झाले आहे. सार्वजनिक निवारा क्षेत्र तसेच बोगदा नियंत्रण यंत्रणा, प्रकाश व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, वायुवीजन यंत्रणा आदींचे काम सुरू आहे. या प्रकल्पात एकूण ४ स्थानके असतील.
ही ४ स्थानके
1.पनवेल
2.मोहोप
3.चिकले चौक
4.कर्जत
पनवेल आणि कर्जतमधील अंतर
२९.६ किमी
खर्च
२,७८२ कोटी
२ रेल्वे उड्डाणपूल
४४ पूल
१५ पुलाखालील रस्ते