पोलिओमुक्त पाकिस्तानसाठी...

    23-Oct-2024
Total Views |
 
 A polio-free Pakistan
 
पाकिस्तान राष्ट्रीय पोलिओ आपत्ती निवारण केंद्रा’चे प्रमुख अन्वारुल हक यांनी स्पष्ट केले. २०२५ पर्यंत पाकिस्तानने पोलिओ उच्चाटनाचे लक्ष्य निर्धारित केले असून, सर्वोच्च प्राथमिकता असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये पोलिओ उच्चाटन कार्यक्रमाचा सरकारने अंतर्भाव केला आहे. आजवर असे अनेक निर्णय पाकिस्तानी सरकारने घेतले. तरी त्याने परिस्थितीत बदल झाला नाही. पाकिस्तानी जनतेच्या मनावरील कट्टरतावादाची पुटे निघतील, तेव्हाच ते राष्ट्र खर्‍या अर्थाने पोलिओमुक्त होईल!
 
रोज मरे त्याला कोण रडे?’ अशी अवस्था पाकिस्तानच्या जनतेची, तर ‘आधीच झाले थोडे, त्यात व्याह्याने धाडले घोडे’ अशी अवस्था पाकिस्तानच्या सरकारची. आकाशच जिथे फाटले आहे, तिथे ठिगळ तरी कशाकशाला लावणार? पाकिस्तानात एकामागोमाग एक अशी संकटांची मालिका सुरुच आहे. आज दि. २४ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक पोलिओ दिन’ जगभरात साजरा होत असताना, पाकिस्तानमध्ये मात्र पोलिओने हाहाकार माजवला आहे आणि हे झाले तरी कसे, याचेच नवल राज्यकर्त्यांना अजूनही वाटत आहे. तर, पाकिस्तानमध्ये पोलिओच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. तसेच, ते गेल्या महिन्यातदेखील झाले. मात्र, या लसीकरणात एक दशलक्षांपेक्षा अधिक लहानग्यांना लस मिळालीच नाही. परिणामस्वरुप, पाकिस्तानमधील पोलिओनिर्बंध उपाययोजनांना खीळ बसला असून, पोलिओने पाकिस्तानात पुन्हा डोके वर काढले आहे.
 
पाकिस्तानात सध्या अचानक ३९ पोलिओ बाधितांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी ही संख्या सहा इतकीच होती. गेल्यावर्षीच्या सहा रुग्णांच्या तुलनेत यावर्षी झालेली ३९ रुग्णांची वाढ ही नक्कीच पाकिस्तानातील चिंतेचे कारण झाली आहे. पाकिस्तानमध्ये दीर्घकाळ जरी पोलिओ निर्मूलन कार्यक्रम सुरु असला, तरीही या कार्यक्रमात सहभागी डॉक्टर, परिचारक, परिचारिका, सुरक्षा यंत्रणा अधिकारी यांच्यावर वारंवार हल्ले झाले आहेत. ‘पोलिओ लसीकरण म्हणजे लहान वयातच मुलांची नसबंदी करण्याचा कट आहे,’ या वेड्या समजुतीपायी हवी तशी गती या मोहिमेने पाकिस्तानमध्ये पकडली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे पाकिस्तानात पोलिओ निर्मूलनाच्या कार्यक्रमात सहभागी आंतराष्ट्रीय संघटनांना, पोलिओ निर्मूलनाबरोबरच अफवांच्या निर्मूलनासाठी मोहीम राबवावी लागते. मात्र, असलेल्या अफवा या धर्मश्रद्धेशी निगडित असल्याने त्यांचा पगडा अधिक आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलिओ निर्मूलन अधिकारी यांच्यात वारंवार खटके उडतात. पोलिओच्या लसीविरोधात अफवा पसरवण्यात पाकिस्तानातील धर्मगुरु आणि दहशतवादी संघटनांचाही मोठा वाटा आहे. मुस्लीम धर्मगुरुच धर्माच्या नावाखाली त्यांच्याच पुढील पिढीला अपंग करण्यात पुढाकार घेताना दिसतात आणि पाकिस्तानचे सरकार हातावर हात ठेवत, अफवा न पसरवण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळेच पाकिस्तानातील परिस्थिती ही चिंताजनक म्हणावी लागेल. पोलिओचे नवीन ‘हॉटस्पॉट’ तयार होणे, हेच पाकिस्तान सरकारच्या चिंतेचे महत्त्वाचे कारण आहे.
 
पोलिओ हा असा आजार आहे, ज्यामध्ये पोलिओचा विषाणू नाक अथवा मुखावाटे मानवाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर अनेकदा तो मानवी मेंदू आणि मज्जासंस्था यांवरही आघात करतो. शरीरातील या विषाणूच्या अस्तित्वामुळे बालकास अर्धांगवायूचा झटका येऊन त्याच्या शरीरातील एखाद्या अवयवावर त्याचा परिणाम दिसू लागतो. त्यामुळेच हा आजार नष्ट करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम रावबली गेली. त्यामुळे जगभरातून पोलिओचे समूळ उच्चाटन झाले आहे. मात्र, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात या रोगाचे अस्तित्व आजही कायम आहे.
 
त्यातच अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या कट्टरपंथी तालिबानी सरकारने धार्मिक कारणाने पोलिओ लसीकरण मोहीम थांबवली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील पोलिओचा उद्रेक पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावर्ती भागांत पोलिओने डोके वर काढल्याने पाकिस्तानात उद्रेक होत असल्याचे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे.
 
त्यामुळेच या वाढलेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर दि. २८ ऑक्टोबरपासून पाकिस्तानात ३२ दशलक्ष बालकांना पोलिओ लस देण्यासाठी नवी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे ‘पाकिस्तान राष्ट्रीय पोलिओ आपत्ती निवारण केंद्रा’चे प्रमुख अन्वारुल हक यांनी स्पष्ट केले. २०२५ पर्यंत पाकिस्तानने पोलिओ उच्चाटनाचे लक्ष्य निर्धारित केले असून, सर्वोच्च प्राथमिकता असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये पोलिओ उच्चाटन कार्यक्रमाचा सरकारने अंतर्भाव केला आहे. आजवर असे अनेक निर्णय पाकिस्तानी सरकारने घेतले. तरी त्याने परिस्थितीत बदल झाला नाही. पाकिस्तानी जनतेच्या मनावरील कट्टरतावादाची पुटे निघतील, तेव्हाच ते राष्ट्र खर्‍या अर्थाने पोलिओमुक्त होईल!
 
कौस्तुभ वीरकर