मुंबईतील जलमार्ग वाहतुकीला बूस्टर डोस

23 Oct 2024 21:21:59

radio club jetti


मुंबई, दि.२३ : विशेष प्रतिनिधी 
दिवसेंदिवस मुंबईतून जलमार्गाने एलिफंटा व अलिबागला जाणाऱ्या पर्यटकांची आणि प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडियावरील जेट्टीवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी आणि पर्यटकांचा सुविधेसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने कुलाब्यातील रेडिओ क्लब येथे नवी जेट्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता सागरी महामंडळाकडून कामाचे कंत्राटही देण्यात आले आहे. लवकरच या नव्या जेटीच्या कामाला सुरुवात होईल. या नव्या जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडियाकडून होणाऱ्या जलप्रवासी वाहतूक क्षमतेत तिप्पटीने वाढ होणार असल्याने पर्यटकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेटवे ऑफ इंडियाच्या जेट्टीवरून दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख प्रवासी वाहतूक केली जाते. गेटवे ऑफ इंडिया ही ऐतिहासिक वास्तू असल्याने ती पाहण्यासाठी लाखो पर्यटक तिथे भेट देतात. याचवेळी आलेले पर्यटक जलमार्गे एलिफंटा आणि अलिबागच्या दिशेने जाण्यास पसंती दर्शवितात. सद्यस्थितीत गेटवे जवळ असलेल्या जेट्टीवर एकावेळेस फक्त ५ बोटींची बर्थिंग ( बोट पार्किंग )करता येते. यामुळे गर्दीच्या आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी आणि नवी जेट्टी उभारत जलमार्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने दोनशे एकोणतीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये खर्च करून नवीन जेट्टी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.


रेडिओ क्लब येथे नव्याने उभारण्यात येणारी जेट्टी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत उभारण्यात येते आहे. या प्रकल्पात केंद्र आणि राज्य शासनाची ५०-५० टक्के भागीदारी असेल. या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या घेण्यात आलाय आहेत. हि जेट्टी ११ हजार ९५१ चौरस मीटर इतका बर्थिंग एरिया म्हणजे बोटींचा पार्किंग एरिया उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकाच वेळेस सुमारे २० बोटी उभ्या करता येणार आहेत. नवीन जेट्टी प्रवासी संख्येमध्ये वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार असून प्रवाशांना बोटीत सुरक्षित चढ आणि उतार करणे शक्य होईल. याचसोबत सागरी मंडळामार्फत रेडिओ क्लब जवळ ठिकाणी प्रवासी-पर्यटन जेट्टी टर्मिनस इमारत आणि ३५० लोकांची क्षमता असणार अम्फीथिएटर, इतर सुविधांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
 
जेट्टीची वैशिष्ट्ये

- टर्मिनल प्लॅटफॉर्म रुंदी - ८० × ८०

- जेट्टी - २१४ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद

- बर्थिंग जेट्टी ( १० प्लॅटफॉर्म्स ) - ३८.७ मी × ७.५ मी

- सुरक्षा तपासणी क्षेत्र, वेटिंग एरिया, टॉयलेट, पाणपोई

- अग्नी सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे

- संरक्षण भिंतीपासून जेट्टी ची पूर्ण लांबी ६५० मी इतकी आहे.
Powered By Sangraha 9.0