समस्या शांततेनेच सोडविणे आवश्यक; भारत सहकार्य करण्यास तयार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियाला आश्वासन, ब्रिक्स शिखर परिषदेस प्रारंभ
22-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील कझान येथे द्विपक्षीय बैठकीसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी युक्रेनचा संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवला जावा असा भारताचा विश्वास आहे आणि ते सर्व शक्य सहकार्य करण्यास तयार असल्याचे आश्वासन त्यांनी रशियास दिले आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियातील कझान येथे मंगळवारी दाखल झाले आहेत.
शिखर परिषदेपूर्वी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या विषयावर आपण पुतीन यांच्य सतत संपर्कात आहोत. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे समस्या शांततेच्या मार्गानेच सोडवण्यावर भारताचा विश्वास आहे. शांतता आणि स्थैर्याच्या स्थापनेस भारताचा पूर्ण पाठिंबा आहे. भारत आगामी काळात सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.
गेल्या तीन महिन्यांतील रशियास दिलेल्या दोन भेटी दोन्ही देशांमधील घनिष्ठ समन्वय आणि सखोल मैत्री दर्शवतात, असेही पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, यापूर्वी जुलैमध्ये मॉस्को येथे झालेल्या दोन्ही देशांच्या वार्षिक शिखर परिषदेने प्रत्येक क्षेत्रात आमचे सहकार्य अधिक मजबूत केल्याचेही पंतप्रधानांनी द्विपक्षीय चर्चेदरम्यान नमूद केले आहे.