मविआत उद्धव ठाकरेंचे कॉंग्रेसमोर लोटांगण; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका!

22 Oct 2024 20:46:19
bjp maharashtra president bawankule
 

महाराष्ट्र :    राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली. मविआ मुळातच अनैसर्गिक असल्याने असल्याने विदर्भातील जागावाटपावरून सुरू असलेल्या वादात उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस लोटांगण घालायला लावत असल्याचा दावा बावनकुळेंनी केला आहे.


ते म्हणाले, भाजप-शिवसेना युतीमध्ये आम्ही मातोश्रीलाच मान द्यायचो. शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, ज्या दिवशी शिवसेनाला कॉंग्रेसकडे जावे लागेल त्या दिवशी पक्ष बंद करेन. असे सांगताना याकरिता सर्वस्वी उद्धव ठाकरे हेच जबाबदार असून कॉंग्रेस कधीही उद्धव ठाकरे यांना स्वीकारणार नाही व सहन करणार नाही. तर महायुती ही नैसर्गिक युती असून सर्वच उमेदवार सक्षम आहेत, जागावाटप होत असताना काही उमेदवार जात असतील तर काहीच समस्या नाही. पक्ष सोडलेल्या संदीप नाईक यांच्या जागी रामचंद्र घरात यांची नियुक्ती केल्याची माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली.

स्वत:च स्वत:चे आत्मचरित्र लिहिल्यावर त्यास समाजमान्यता मिळतेच असे नाही, असा टोला बावनकुळे यांनी अनिल देशमुखांच्या पुस्तकाबाबत लगावला. तसेच, मी आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी अर्ज दाखल करणार आहोत. महायुतीमध्ये शिंदे नाराज असल्याच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचे सांगत साकोलीमधून भाजपाचा उमेदवार लढणार असून जागावाटपात केवळ ८ ते १० जागांवरच चर्चा व्हायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.




Powered By Sangraha 9.0