मुंबई : भाजप नेते निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधतील. त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे.
निलेश राणे म्हणाले की, "मी २०१९ ला राणे साहेब, नितेश राणे आणि आमचे असंख्य पदाधिकारी आणि कारकर्त्यांना घेऊन भाजपध्ये आलो. भाजपमध्ये आल्यानंतर खूप सन्मान, आदर आणि प्रेम मिळालं. इथे काम करण्याची शिस्त जवळून बघितली आणि शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लहान भावाप्रमाणे मला सांभाळलं. पक्षात स्थान दिलं. तसेच रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार या सर्वांनी मला भावाप्रमाणे सांभाळलं. या पक्षाशी माझे जीवाभावाचे संबंध आहेत."
हे वाचलंत का? - पुणे पोलिसांकडून २१ बांग्लादेशींना अटक! किरीट सोमय्यांची माहिती
"जेव्हापासून राजकारणाला सुरुवात झाली तेव्हापासून राणे साहेबांच्या सावलीत काम केलं. उद्या २३ तारखेला ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. महायूतीमध्ये आम्ही सगळे समन्वयाने काम करत आहोत. राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षात आणि ज्या चिन्हावर झाली त्या पक्षात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे. पंरतू, भाजपशी असलेल्या माझ्या संबंधामध्ये कोणताही बदल होणार नाही," असे त्यांनी सांगितले.