ध्येयविरहित शिक्षण व्यवस्था देशासाठी घातक! : डॉ. मनमोहन वैद्य

22 Oct 2024 13:13:24

Dr. Manmohan Vaidya Pune

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Manmohan Vaidya Education system)
"उन्नती करीता उत्पन्नाचे साधन असले पाहिजे, परंतु ते जीवनाचे ध्येय असू शकत नाही. सामाजिक परिवर्तन हे जीवनाचे ध्येय असले पाहिजे. दुर्दैवाने आजची शिक्षणपद्धती उद्दिष्टहीन झाली आहे आणि जे साध्य करायचे आहे केवळ त्यास महत्त्व दिले जात आहे. ध्येयविरहित शिक्षण व्यवस्था देशासाठी घातक आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.

हे वाचलंत का? : मंदिर स्वच्छता सेवा अभियानाला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुण्यातील टिळक मार्गावर असलेल्या श्री गणेश सभागृहात 'विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, महाराष्ट्र प्रांत' मराठी प्रकाशन विभाग आयोजित 'अमृत मिलन' कार्यक्रमात नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान केंद्राचे जीवनव्रती विश्वास लापळकर यांच्या अनुभवांवर आधारित 'अरुण रंग' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुख प्रदीप जोशी, विवेकानंद केंद्राचे महासचिव भानुदास, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर आदी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधत डॉ. मनमोहन वैद्य पुढे म्हणाले, की जीवनाचे ध्येय आणि साध्य यात फरक आहे. डॉक्टर किंवा इंजिनिअर बनणे हे शिक्षणाचे साधन असू शकते. परंतु ध्येय नाही. शिक्षणाचे उद्दिष्ट सामाजिक परिवर्तन असावे. एक व्यक्ती म्हणून आपले जीवन यशस्वी होण्यापेक्षा अर्थपूर्ण होणे गरजेचे आहे. समाजात सामाजिक भांडवल वाढत राहायचे म्हणजे जीवन सार्थक व्हायला हवे.

अ.भा.सह-प्रचार प्रमुख प्रदीप जोशी म्हणाले की, "जनजाती समाज हा आपल्यापेक्षा अधिक संघटित आणि सुसंस्कृत आहे. पूर्वांचलबाबत स्थानिक लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांनीच जास्त प्रचार करून खोटे नरेटीव याठिकाणी तयार केले आहेत. आपला कायदा, संस्कृती, नवीन तंत्रज्ञान आणि भाषा समृद्ध मानणारा जनजाती समाज अधिक समृद्ध आहे. त्यांचा सकारात्मकपणा आणि सर्जनशीलता उर्वरित भारतीयांपर्यंत पोहोचले पाहिजे."

Powered By Sangraha 9.0