...म्हणून ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले! लाडकी बहिण योजनेबाबात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

22 Oct 2024 13:15:35
 
Eknath Shinde
 
जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आचारसंहितेचा अडसर येणार याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आलेला महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आचारसंहितेचा अडसर येणार याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे देऊन टाकले होते. ही योजना बंद करण्यासाठी काही जण पहिले मुंबई आणि नंतर नागपुर कोर्टात गेले आहेत. मात्र मला खात्री आहे की, माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूनेच कोर्ट निकाल देईल. तसेच काही जणांनी निवडणूक आयोगाने ही योजना बंद करायला सांगितल्याची अफवा पसरवण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र नोव्हेंबरचा हफ्ता अगोदरच दिला असून २० तारखेनंतर आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचा हफ्ता देखील देण्यात येईल. कुणीही कितीही प्रयत्न केले तरीही ही योजना बंद होणार नाही," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "आतापर्यंत कुठल्याही सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या हितासाठीच्या योजना सुरू करून राबवल्या नाहीत, ज्या गेल्या दोन वर्षात आपल्या महायुती सरकारने सुरू करून यशस्वीपणे राबावल्या. मुख्यमंत्री म्हणजे सीएम म्हणजेच 'कॉमन मॅन' आहे मात्र, मला राज्यातील जनतेला 'सुपर मॅन' करायचे आहे. परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनच्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही," असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0