खलिस्तान्यांना कॅनडा सरकारची फूस! कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांचा दावा

21 Oct 2024 15:51:10

verma canada
 
 ओटावा: (India Canada Row) भारत आणि कॅनडा मध्ये सुरू असलेल्या वादामध्ये आता एक नवीन खुलासा समोर आला आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजीव कुमार वर्मा यांनी असा दावा केला आहे की, शीख फुटीरतावादी हे कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेचे हस्तक आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांना खुद्द कॅनडा सरकार प्रोत्साहन देत असते. हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर सुरु झालेल्या भारत कॅनडा वाद अद्याप शमण्याचे नाव घेत नसून, दिवसेंदिवस या प्रकरणात नवीन खुलासे होत आहे.

भारतात परतण्यापूर्वी कॅनडातील एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संजय कुमार वर्मा म्हणाले की, "कॅनडा सरकार फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देत आहे, हा माझा आरोप आहे. साततत्याने खलिस्तानी लोकांना पाठीशी घालण्याचे काम या सरकारने केले आहे. इथल्या गुप्तचार यंत्रणा या फुटीरतावाद्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी वेळोवेळी करत असतात. ही बाब अतिशय गंभीर असून कॅनडा सरकारने वेळीच यात लक्ष्य घालायला हवे." फुटीरतावाद्यांच्या भारतातील कारवायांवर भाष्य करताना वर्मा म्हणाले " भारतामध्ये काय होईल याचा निर्णय भारतीय नागरिक घेतील. हे खलिस्तानी दहशतवादी भारतीय नागरिक नसून कॅनडाचे नागरिक आहेत. दुसऱ्या देशाच्या सार्वभौम्तवाला हात लावण्याचे काम कोणी करु नये.

पुरावे सादर केले नाही!
हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येवरुन झालेल्या गदारोळावर भाष्या करताना वर्मा म्हणाले " कॅनडाने अद्याप भारताला कुठल्याही प्रकरचा पुरावे सादर केले नाहीत. ठोस पुरावे असल्याशिवाय संवाद होऊ शकत नाही. कॅनडा सरकारने या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली नाही." कॅनडा सरकारने केलेले आरोप हे राजकीय वैमानस्यातून निर्माण झालेले असून यात कोणतीही सत्यता नाही असे सुद्धा वर्मा म्हणाले.

 
Powered By Sangraha 9.0