काश्मीरात दहशतवादी हल्ला! एका डॉक्टरसह सहा मजूर ठार

21 Oct 2024 13:50:20

kashmir attack
 
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात रविवारी रात्री एका बोगद्याजवळ बांधकाम सुरु असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, यात एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित मजूरांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी खासगी कंपनीच्या कॅम्प हाउसिंग कामगारांवर गोळीबार केला. लष्कर आणि पोलिसांनी या परिसराची नाकेबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू होता.

पाकिस्तानच्या लष्कर ए तय्यबा या संघटनेच्या द रेसीस्टेंस फ्रंट (TRF) या शाखेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. टीआरएफ या संघटनेचा म्होरक्या शेख सज्जाद गुल आणि त्याच्या स्थानिक सहाकार्यांच्या मदतीने हा हल्ला घडवून आणल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. मागची दीड वर्षापासून ही संघटना काश्मीरी पंडीत, शीख समुदायातील लोकांवर हल्ला करत आहे. गेल्या महिनाभरापासून या दहशतवादी गटाने या परिसराची रेकी केली होती.

NIA करणार हल्ल्याची चौकशी
केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA)चे पथक या हल्ल्याची चौकशी करणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एनआयएची टीम घटनास्थळी दाखवणार आहे. माध्यमांना मिळलेल्या माहितीनुसार, डॉ. शाहनवाज आणि स्थलांतरीत कामगार हे झेड मोर बोगद्याचे काम करणाऱ्या टीमचा भाग होते. हा बोगदा गगनीर पासून ते गांदरबलमधील सोनमर्गला जोडणारा आहे.

काश्मीरचा पाकिस्तान होणार नाही.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी या घटनेवर प्रतिक्रीया देताना म्हणाले की, पाकिस्तानच्या नेतृत्वाला मला एकच गोष्ट सांगायची आहे की, काश्मीरचा पाकिस्तान होणार नाही. भारतासोबत जर पाकिस्तानला चांगला संबंध ठेवायचा असेल तर, या हल्ल्यांवर वेळीच प्रतिबंध घालायला हवा. काशमीरच्या धरतीवर जर अश्या कारवाई झाल्या तर याचे परिणाम वाईट होतील असे सुद्धा अब्दुल्ला म्हणाले.

१८ ऑक्टोबर रोजी शोपियान जिल्ह्यात बिहारमधील एका स्थलांतरित मजुराची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर, गांदरबलमध्ये हा हल्ला झाला. याच वर्षी एप्रिलमध्ये अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात बिहारमधील एका मजुराला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते.
 

Powered By Sangraha 9.0