
तिरुवनंतपुरम : भारतीय जनता पक्षाने १९ ऑक्टोबर रोजी, केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नाव्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवरुन त्यांचा सामना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्याशी होणार आहे. लोकसभा निवडणूकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन जागांवरुन निवडणूक लढवली. दोन्ही जागा राहुल गांधी यांनी जिंकल्या. यानंतर, गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने १३ नोव्होंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा केली आहे. या निवडणूकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
कोण आहेत नाव्या हरिदास ?
नाव्या हरिदास या भाजप महिला मोर्चाच्या केरळ राज्य महासचिव आहेत. त्यांनी कोझिकोड महानगरपालिकमध्ये दोन वेळा नगरसेविकेचा पदभार सांभाळला आहे. महानगरपालिकमध्ये त्या भाजपच्या संसदीय पक्षनेत्या सुद्धा राहिल्या आहेत. २०२१ मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणूकीत कोझिकोड दक्षिण मतदारसंघासाठी त्या एनडीएच्या उमेदवार होत्या. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, माध्यमांना प्रतिक्रीया देताना म्हणाल्या "भाजपाने माझी निवड केल्याबद्दल मला आनंद झाला आहे. वायनाड मतदारसंघातील लोकांना प्रगतीची आशा आहे. इथल्या काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे त्या पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. या निवडणूकीपासून वायनाडच्या लोकांना, त्यांचे खरे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनीधी अपेक्षित आहे,जे लोकांच्या समस्या समजून घेऊन, त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतील. मनाला येईल तेव्हा हजेरी लावणारे नेते त्यांना नको आहेत." हरिदास यांच्या नामांकनाव्यतिरिक्त, भाजपने आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
निवडणूक आयोगाने अलीकडेच १५ राज्यांमधील ४८ विधानसभा जागांसाठी आणि लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. वायनाड लोकसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.