बुलेट ट्रेनसाठी विक्रमी वेळेत अतिरिक्त बोगद्याचे काम

समुद्रातील बोगद्यांसाठी खोदकामाला गती, ‘अदित पोर्टल’चे खोदकाम विक्रमी वेळेत पूर्ण

    02-Oct-2024
Total Views |
 
adit tunnel
 
मुंबई, दि. १ : (Bullet Train Project) बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पहिल्या सात किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्यासह २१ किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामांना गती देण्यासाठी ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून ३९४ मीटर लांबीच्या अ‍ॅडिशनल ड्रिव्हन इंटरमीडिएट टनेल (एडीआयटी बोगदा)चे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. हा बोगदा समुद्राखालील बोगद्याचे काम सुलभ करणार आहे.
 
वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मुंबई बुलेट ट्रेन भूमिगत स्थानक ते महाराष्ट्र राज्यातील शिळफाटा दरम्यान २१ किमी लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. यामध्ये सात किमी लांबीचा भारतातील पहिला भूमिगत समुद्राखालील बोगदा बांधण्यात येत आहे.
या बोगद्याच्या २१ किमीपैकी १६ किमी बोगदा टनेल बोरिंग मशिनद्वारे, तर उर्वरित पाच किमी न्यू ऑस्टीयन टनेलिंग मेथड (एनएटीएम)द्वारे बांधण्यात येणार आहे. या भूमिगत मार्गिकेच्या कामासाठी तीन शाफ्ट घेण्यात आले आहेत. हे शाफ्ट बोगद्याच्या खोदकामासाठी टनेल बोअरिंग मशीन खाली उतरवण्यास मदत करतील.
 
मुंबईत बीकेसी एचएसआर स्थानकाच्या बांधकामस्थळी पहिला शाफ्ट असून त्याची खोली ३६ मीटर आहे. या शाफ्टचे १०० टक्के सेकेंट पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. विक्रोळीतील शाफ्ट क्रमांक दोन हा ५६ मीटर खोल असून याचेही १०० टक्के सेकेंट पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर आजमितीस शाफ्टसाठी सुमारे ९२ टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. सावली (घणसोलीजवळ) येथील शाफ्ट क्रमांक तीनची खोली ३९ मीटर असून याचेही १०० टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. या शाफ्टमुळे या वर्षाच्या अखेरीस पहिले टनेल बोरिंग मशीनखाली उतरविण्यास उपलब्ध होणार आहे. शिळफाटा हे बोगद्याचे एनएटीएम टोक आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत २०० मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.
 
एडीआयटी पोर्टल
 
३९४ मीटर लांबीचा ‘अ‍ॅडिशनल ड्रिव्हन इंटरमीडिएट बोगदा’ सहा महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. यामुळे शिळफाटा व्यतिरिक्त खोदकामासाठी दोन अतिरिक्त एनएटीएम फेसची सोय झाली आहे. या अतिरिक्त प्रवेशामुळे ७०० मीटरहून अधिक भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत परिमाणाचे एडीआयटी ११-मीटर ु ६.४ मीटर बांधकाम आणि ऑपरेशनदरम्यान मुख्य बोगद्यात थेट वाहनांना प्रवेश देईल आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर प्रक्रियेच्या उद्देशानेदेखील वापरला जाऊ शकतो.