जरांगेंना रसद पुरवणारे ५० उमेदवार पाडण्याची यादी तयार! रोहित पवार, राजेश टोपेंचाही समावेश

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं विधान

    02-Oct-2024
Total Views |
 
Jarange
 
नागपूर : विधानसभा निवडणूकीत रोहित पवार, राजेश टोपेंसह ५० उमेदवार पाडण्याची आमची यादी तयार आहे, असं विधान ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तसेच मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही मतदान का करायचं? असा सवालही त्यांनी केला आहे.
 
लक्ष्मण हाके म्हणाले की, "ज्या नेत्यांनी मनोज जरागेंचं आंदोलन पाळलं, पोसलं आणि त्यांना डिझेल, पैसे, गाड्या पुरवल्या त्यांना ओबीसींनी मतदान का करायचं? अशा ५० उमेदवारांची यादी आमची तयारी आहे आणि आम्ही ५० मतदारसंघात जाऊन सभा घेणार आहोत. राजेश टोपे असोत किंवा रोहित पवार असो आम्ही ५० उमेदवारांना पाडणार आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसींची भूमिका घेणारे अनेक ओबीसी तरूण दिसतील," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं! तिघांचा मृत्यू
 
ते पुढे म्हणाले की, "ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व ओबीसी बांधव आणि नेत्यांनी त्याला विरोध करावा. ओबीसी आरक्षणाकडे फक्त निवडणूकीच्या दृष्टीकोनातून न पाहता सामान्य ओबीसींच्या हितासाठी विदर्भातील नेत्यांनी पुढे यायला हवं. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील ५० उमेदवार पाडण्याची आमची यादी तयार आहे. तसेच ५० उमेदवार निवडणून आणण्याची यादी आम्ही तयार करणार आहोत."
 
"ओबीसींच्या सर्व नेतृत्वांना जर निवडणूका जिंकण्याबाबत संभ्रम असेल तर तुम्हाला ओबीसींच्या मतांची भीती कधी वाटणार आहे? महाराष्ट्रातील पक्षांकडून ओबीसींना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. त्यामुळे ओबीसींच्या नेत्यांनी कुणाच्याही मेहबानीवर न जगता पुढे येऊन लढावं. तुमच्यामागे ५० ते ६० टक्के लोक आहेत. या लोकांची भीती शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांना कधी वाटणार? ओबीसी आरक्षणावर त्यांची अधिकृत भूमिका काय आहे? याचं उत्तर जोपर्यंत ते देणार नाहीत तोपर्यंत येणाऱ्या निवडणूकीत ओबीसी त्यांना जाब विचारेल," असेही ते म्हणाले.