”चाहत्यांच्या आर्शिवादामुळे गोविंदा पुन्हा नाचू लागतील” – सुनीता अहुजा
02-Oct-2024
Total Views |
मुंबई : अभिनेते आणि शिवसेना नेते गोविंदा यांना स्वत:च्याच बंदुकीतून गोळी लागून पायाला गंभीर दुखापत झाली होती. १ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ही दुर्घटना घडली. रिव्हॉल्वरचे लॉक खुलं असल्याने चुकून गोळी लागल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, या अपघातानंतर त्यांना तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता त्यांची तब्येत सुधारत असल्याची माहिती गोविंदा यांच्या पत्नी सुनीता अहुजा यांनी दिली आहे.
गोविंदा यांच्या पत्नी सुनीता अहुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदा यांना आय.सी.यु वॉर्डमधून जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आले आहे. सुनीता म्हणाल्या की, “चाहत्यांनी घाबरु नये. गोविंदा ठीक आहेत. कदाचित त्यांना परवा डिस्चार्ज देखील करण्यात येईल असा अंदाज आहे. गोविंदा यांच्या चाहत्यांच्या आर्शिवादामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. आणि त्यांच्या चाहत्यांना मी सांगू इच्छिते की काही महिन्यांनी पुन्हा ते डान्स करु लागतील आणि तुमच्या मनोरंजनासाठी येतील”.
दरम्यान, गोविंदा यांच्याकडून त्यांच्याच परवानाधारक बंदुकीचा ट्रीगर अनावधानाने दाबला गेला आणि त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे हा अपघात झाला होता. तसेच, याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत. गोविंदा यांच्या मॅनेजरने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा पहाटेच एका कार्यक्रमासाठी कोलकत्याला जाणार होता. तयार होत असताना त्यांनी त्यांची लायसन्स रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवण्यासाठी हातात घेतली. मात्र ती चुकून हातातून खाली पडली. रिव्हॉल्वरचं लॉक खुलं राहिल्याने त्यांच्या पायाला गोळी लागली. त्यांना लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया करुन पायातून गोळी काढण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून लवकरच त्यांना घरी दखील सोडण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.