धर्मादाय रुग्णालयातील बेडचे रिअल टाइम मॉनिटरिंग

धर्मादाय आयुक्तालयातील कागदपत्रांचेही डिजिटायजेशन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उपक्रमाचे लोकार्पण

    02-Oct-2024
Total Views |

dharmaday
 
मुंबई, दि. २ : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करतायेत हे महत्त्वाचे असून विभागाने अधिकाधिक लोकाभिमुख कामे करावीत असे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता हेल्पलाईनचे उद्घाटन, धर्मादाय रुग्ण योजनेच्या अंमलबजावणीकरीता ऑनलाईन प्रणाली, रुग्णाकरिता २४ तास हेल्पलाईन सुविधा, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवार, दि. २ रोजी वरळी येथील सस्मिता इमारतीत झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव उदय शुक्ल, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक,पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी यांची उपस्थिती होती.
 
उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा मोफत व सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संघटना आणि वैद्यकीय कक्ष यांनी समन्वयाने काम करीत आहेत.आपल्याकडे धर्मादाय रुग्णालयात गरजू आणि निर्धन असणाऱ्या लोकांसाठी आरक्षित बेड असतात. हे ७०-८० टक्के बेड हे रिकामे असतात कारण त्याची माहिती नसते. आम्ही अधिवेशनात कायदेशीर तरतूद करून हे बेड पारदर्शकपणे भरले जातील यासाठी शासनाला अधिकार दिले. शासनाच्या माध्यमातून चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून हे व्यवस्थापन केले जाते. यासंदर्भांतील एका पोर्टल आपण तयार केले आहे. सर्व आरक्षित बेडची माहिती या पोर्टलवर देण्यात येईल. हे अत्यंत पारदर्शकपणे होईल. या व्यक्तीकडून कोणीही पैसे वसूल करू शकणार नाही. कोणीही हे बेड रिकामे ठेवू शकणार नाही. उपमुख्यंमत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शकपणे राबविली जाईल.
 
यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे औपचारिक उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपूर्वीच कक्षाचे कामकाज सुरू झाले असून गेल्या १० महिन्यात कक्षामार्फत ३२३ रुग्णांना गंभीर आजारांसाठी मदत करण्यात आहे. तर मदतीची रक्कम १२ कोटी ७३ लक्ष एवढी असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळास भेट दिल्यावर राज्यातील धर्मादाय रुग्णालये, त्यांच्याकडील राखीव बेडची संख्या, यांची माहिती मिळणार आहे.
 
राज्यभरात धर्मादाय रुग्णालयांचे जाळे
 
राज्यातील हिंगोली जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये धर्मादाय रुग्णालयांचे जाळे पसरले आहे. राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे ४६८ रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे १२००० बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, एन.एन रिलायन्स, बाई जेरबाई वाडिया, डॉ.बाला भाई नानावटी रुग्णालय, ब्रीच कॅण्डी रुग्णालय , दि बॉम्बे रुग्णालय, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, डी.वाय.पाटील रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय, संचेती रुग्णालय, जहांगीर रुग्णालय इत्यादी मोठ्या रुग्णालयाचा समावेश आहे.