लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार! दोन महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार
02-Oct-2024
Total Views |
मुंबई : यंदा लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना हे गिफ्ट दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून राज्यभरात या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने त्याआधीच पैसे जमा करून लाडक्या बहिणींना भाऊबीजेचं गिफ्ट मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका सभेत बोलताना याबाबत माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "आधी आम्ही लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रूपये दिले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले. मात्र, आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे १० ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी म्हणून बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो. बहिणींनो काळजी करू नका हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. हे पैसे तुमच्याकरिता वापरा," असे ते म्हणाले.