भारतीय प्रवाशांसाठी खुशखबर! जाणून घ्या दुबईच्या व्हिसा-ऑन-अरायव्हलचे नवे नियम

19 Oct 2024 13:40:42

india uae
 
अबू धाबी : भारत आणि संयुक्त अरब अमिराती अर्थात, युएई या देशांमधील संबंध दृढ होण्याच्या दिशेने अजून एक पाऊल उचलण्यात आले आहे. पासपोर्ट धारक सगळे भारतीय प्रवासी युएई मध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हलसाठी पात्र ठरणार आहेत.

नवीन धोरणानुसार, हा उपक्रम भारतीय पासपोर्ट धारक तसेच निवासी, ग्रीन कार्ड किंवा अमेरीका, इंगलंड किंवा कुठल्याही युरोपियन युनियन राष्ट्राने जारी केलेल्या, वैध व्हिसा असलेल्या व्यक्तींसाठी खुला आहे. या धोरणांतर्गत प्रवाशांना व्हिसा मिळवण्यासाठी दोन पर्याय असतील.त्यातील पहिला पर्याय म्हणजे प्रवासी १४ -दिवसांचा व्हिसा ऑन अरायव्हल निवडू शकतात, जो अतिरिक्त १४ दिवसांसाठी वाढवला जाऊ शकतो. दुसरा पर्याय म्हणजे ६० दिवसांचा व्हिसा ते निवडू शकतात, ज्याची मुदत वाढ करता येणार नाही. यूएईच्या नियमांनुसार प्रवाशांना शुल्क भरावे लागेल. व्हिसा-ऑन-अरायव्हल या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र होण्यासाठी प्रवेशाच्या तारखेपासून पासपोर्ट किमान सहा महिन्यांसाठी वैध असणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त, दुबईने त्याच महिन्यात भारतीय नागरिकांना पाच वर्षांचा मल्टीपल एनट्री व्हिसा मंजूर केला. हा व्हिसाचा नवीन पर्याय म्हणजे भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील व्यावसायिक, पर्यटन आणि आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल आहे. दुबईसाठी भारत हा पर्यटकांचा प्रमुख स्त्रोत आहे. २०२३ मध्ये भारतातून आलेल्या २.४६ दशलक्ष्य प्रवाशांचे स्वागत केले. या नवीन धोरणामुळे येत्या काळात युएई मध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
Powered By Sangraha 9.0