रांची : झारखंडच्या निवडणूकीचे बिगुल वाजल्यानंतर आता जागावाटपावरुन इंडी आघाडी मध्ये नाराजीनाट्य बघायला मिळते आहे. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्या जागावाटपावरुन, मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल (RJD)ने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा ८१ पैकी ७० विधानसभा जागांवर उमेदवार उभे करतील अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे. या मध्ये आरजेडी या पक्षाचे स्थान काय असेल या बद्दल अद्याप स्पष्टता नाही.
आरजेडीचे नेते मनोज झा यांनी माध्यमांशी संवाद साधला. जागावाटपावर भाष्य करताना ते म्हणाले, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आमच्या नेतृत्वाचे स्थान भक्कम आहे. भाजपच्या विरोधात आघाडी उघडून विजयी व्हायचे हेच आमचे ध्येय आहे. आम्हाला विचारात न घेता जर का आघाडीचे लोक निर्णय घेणार असतील तर ही गोष्ट चुकीची आहे. आम्ही एकटे सुद्धा भाजपला हरवण्याची ताकद ठेवतो. याच संदर्भात माध्यमांनी जेव्हा काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याशी संवाद साधला तेव्हा मात्र त्यांनी या नाराजीचा दावा फेटाळून लावला व इंडी आघाडी मध्ये सगळं अलबेल असल्याचे सांगितले आहे.
भाजपाचा सल्ला
इंडी आघाडीच्या नाराजीनाट्यावर भाष्य करताना भाजप नेते लक्ष्मीकांत बाजपेयी म्हणाले की काँग्रेस पक्षाला आत्मपरिक्षणाची गरज आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवण्याऐवजी स्वता:कडे लक्ष्य दिल्यास जास्त बरे होईल. भाजपने जितका व्यव्सथित निर्णय घेतला आहे. तितका काँग्रेस पक्षाला अद्याप घेता आला नाही. काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद स्वता:कडेच ठेवायचे आहे म्हणून हा सगळा खटाटोप सुरु आहे.
झारखंड विधानसभेची निवडणूक १३ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत होणार असून, ही निवडणूक २ टप्प्यांमध्ये होणार आहे. या निवडणूकीची मतमोजणी आणि निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी घोषित होणार आहे.