‘रतन टाटा : एक दीपस्तंभ’- शंतनू नायडू

19 Oct 2024 22:50:34
ratan tata ek deepstambh shantanu naydu
 
 
आपल्या आयुष्यात कोण येणार, हे नियती ठरवत असते. नियतीचे फासे फिरले की, अशक्य गोष्टी शक्य होतात असं वाटतं. शंतनू नायडू या तरुणाबद्दल ऐकलं आणि वाटलं, जगात चांगला विचार करून काम केलं की, आपल्याला सहज न वाटणारी गोष्टही सहज भेटून जाते. मग सगळं आयुष्य स्वप्नवत वाटावं, असंच पुढे घडत जातं. खरंतर आपल्याकडे दैनंदिनी लिहिण्याची सवय अनेकांना होती. तीच ही दैनंदिनी आणि त्यातीलच हे प्रसंग आहेत. आठवणीच्या गावी माणूस रमतो आणि त्यातून त्याला जे गवसतं, त्यात सच्चेपणा आणि साधेपणा असतो. असच काहीसं हे पुस्तक, शंतनू नायडू याने लिहिलेले ‘रतन टाटा : एक दीपस्तंभ’.
 
रतन टाटा एक दीपस्तंभ या पुस्तकात, कितीतरी सुंदर अनुभव शब्दबद्ध केले आहेत. बेघर कुत्र्यांप्रती असणार्‍या संवेदनेतून शंतनूने मेल करणे काय, किंवा मग बॉम्बे हाऊसला रतन टाटा यांना पहिल्यांदा भेटणे असो, किंवा मग त्याच बाँबे हाऊसमधील कायमचा होणे, हा प्रवास वाचून आपण समृद्ध होत जातो.

रतन टाटांशी शंतनू नायडू याची झालेली पहिली भेट, त्यातून पहिल्या भेटीचा फोटो आणि मग मैत्रीचं नाते. शंतनू त्यावेळी विशीतला तरुण होता. रस्त्यावर गाड्यांच्या चाकांखाली चिरडल्या जाणार्‍या भटक्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी, त्याने एक अभिनव योजना शोधून काढली. स्वतः रतन टाटांना भटक्या कुत्र्यांबद्दल अतोनात कणव असल्याने, त्यांनी शंतनूच्या कृतीची दखल घेतली. शंतनू याची काम करण्याची जिद्द आणि चिकाटी बघून टाटांनी प्रभावित होऊन, त्यांनी शंतनूच्या व्यवसायात पैसे तर गुंतवलेच, पण, कालांतराने ते शंतनूचे गुरू, बॉस आणि अनपेक्षितपणे प्रिय मित्रसुद्धा झाले. पण, हे एका रात्रीत किंवा स्वप्नवत वाटावं असं अजिबात नाही. प्रसंगी त्यालाही बोलणीही खावी लागली, त्यालाही ओरडा खावा लागला. पण रतन टाटांच्या परिसस्पर्श त्याला लाभत असताना, तो स्वतःत बदल करत होता. याच पुस्तकातील अनेक घटना प्रसंग मन स्पर्शून जाणार्‍या आहे.

रतन टाटा यांनी त्याला वेळोवेळी काही छान आणि प्रभावी विचार दिले. या पुस्तकात ते मुळातून वाचनीय आहे. पण, मला आवडलेला परिच्छेद आपल्यापैकी प्रत्येकाला लागू होईल असे सांगताना, ते शंतनूला म्हणाले, “शंतनू हे बघ, कित्येकदा आपली सगळी कामं होतील आणि बरेचदा तशी ती होणारही नाहीत. जेव्हा तशी ती होणार नाहीत, तेव्हा काहीही झालं, तरी ते काम उरकून टाकायचंच असं मनात ठेवू नको. आलं लक्षात?” किती मोलाचा संदेश टाटांनी दिला.

एका संध्याकाळी शंतनूने त्यांना सांगितलं की, “मी जेव्हा पुस्तक लिहेन तेव्हा त्यांची ही दुसरी बाजू त्यात मांडेन. ऐतिहासिक घटना किंवा व्यावसायिक क्षेत्रात मिळवलेलं यश याबद्दल त्यात लिहिणार नाही. आम्हा दोघांबद्दल, आम्ही एकत्र केलेल्या अनेक गोष्टींबद्दल मी लिहेन. माझ्या नजरेतून ते कसे दिसतात? जगाला अपरिचित असणारे त्यांच्या स्वभावाचे कंगोरे कोणते आहेत? अशा गोष्टी मी त्यात लिहेन.

त्याच्या बोलण्याला होकार देत ते म्हणाले, “मुला, कुठलंही एक पुस्तक प्रत्येक बाजू समोर आणू शकत नाही. प्रत्येक गोष्टीचे वेगळे आयाम असतात. लेखक वेगळे असतात. दृष्टिकोन वेगळे असतात. हे बघ, तू तुझं काम कर. स्वतःचा दृष्टिकोन मांड.” आणि शंतनूच्या दृष्टिकोनातून अनुभवलेले टाटा अनुभवण्यासाठी हे आवर्जून वाचायला हवे.
 
स्वतः शंतनू पुस्तकाबद्दल लिहितो. या पुस्तकाचं विचाराल तर मनापासून या पुस्तकाची निर्मिती झाली असून, त्यामागे केवळ आणि केवळ नितांत प्रेमच आहे. अजूनही कितीतरी गोष्टी मी लिहिलेल्या नाहीत. त्यांच्याकडून शिकून घेण्याचा खरा सोहळा, देशासमोर असणारी जी आव्हानं ते सोडवू पाहतात त्याकडे पाहणं, त्यांच्याकडून किमान एखादं वाक्य तरी कानावर पडावं, यासाठी सतत आतुर असणार्‍या तरुणाईशी जोडून घेणं,अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात असू शकतो.
 
ते रागावलेले आणि संतापलेले शंतनूने पाहिले आहेत. पण, दुःखी-कष्टी होऊन बसलेले फारच क्वचित पाहिले आहे. त्यांना शिटी वाजवताना पाहिलं आहे, मिश्कीलपणा करताना पाहिलं आहे. स्वतःच्या पूर्वानुभावांमध्ये हरवून जाताना पाहिलं आहे, त्यांच्या नजरेतली चमक पाहिली आहे. त्यांच्या दृष्टीत साठलेली समानुभूती पाहिली आहे. आकाशाकडे नजर टाकताना त्यांना पाहिलं आहे. आजवर केलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रवासात ते त्याच्याबरोबर होते. रतन टाटांच्या संपर्कात ज्या दिवशी शंतनू आला, तो दिवस तो कधीच विसरू शकणार नाही. त्यांना पाहून त्याला दीपस्तंभाची आठवण झाली होती.
 
रतन टाटा एक दीपस्तंभ अतिशय प्रामाणिक भावकथा आहे. एकविसाव्या शतकातला तरुण आणि ऐंशीच्या दशकातला तपस्वी, यांच्यातल्या अनोख्या नात्याची वीण आपल्यासमोर येते. रतन टाटा यांनी स्वतः या पुस्तकाचे संपूर्ण हस्तलिखित वाचले आहे. मूळ पुस्तक i came upon a lighthouse हे इंग्रजी आहे. पण, याचा स्वैर अनुवाद सुचिता नंदापुरकर यांनी देखणा आणि साजेसा केला आहे. मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात टाटा येतील, आपल्यालाही शंतनू नक्की होता येईल फक्त तसे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठीच रतन टाटा एक दीपस्तंभ वाचून, संग्रही असावे असेच आहे आणि भेट देण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे.

रतन टाटा एक दीपस्तंभ
(रतन टाटा यांच्यासमवेत काही स्मृतिक्षण)
लेखक: शंतनू नायडू. अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके
रेखाचित्रे : संजना देसाई
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस
किंमत : 399/-


सर्वेश फडणवीस
Powered By Sangraha 9.0