इस्रायलचा हमासला मोठा झटका! लष्करी हल्ल्यात याह्या सिनवार ठार

18 Oct 2024 12:12:15

yahya sinwar
 
तेल अवीव : हमास आणि इस्रायल मध्ये सुरु असलेल्या युद्धात आता हमासला इस्रायलने मोठा झटका दिला आहे. हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा इस्रायलच्या सैन्याने खात्मा केला आहे. दिनांक १६ ऑक्टोबर रोजी, दक्षिण गाझा पट्ट्यात लष्करी कारवाई करत असताना, इस्रायलच्या सैन्याने सिनवार याला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने हल्ला चढवला. या हल्ल्याच्या नियोजनात याह्या सिनवार याचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. वर्षभर सुरु असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला यामुळे नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण होता याह्या सिनवार?
पॅलेस्टिनी दहशतवादी याह्या सिनवार हा १९८०च्या दशकापासून हमास संघटनेची जोडला गेला होता. हमासचा संस्थापक शेख अहमद यासीन याने सिनवारला अंतर्गत सुरक्षा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. इस्लामी कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याचे काम सिनवार करत असे. इस्रायल सोबत काम करत असल्याच्या संशायावरुन एकदा त्याने सरसकट १२ जणांची कत्तल केली होती. यामुळे त्याला खान युनीसचा कसाई अशी ओळख प्राप्त झाली होती. इस्रायलने त्याला अटक केल्यानंतर तब्बल २ दशके तो इस्रायलच्या तुरुंगात होता. २०११ साली त्याची मुक्ततता करण्यात आली. सुटल्यानंतर पुन्हा एकदा सिनावर हमासच्या कारवायांमध्ये सक्रिय झाला आणि इस्रायलच्या डोकेदुखीत वाढ झाली. हमास, हिजबुल्लाह आणि इराण यांची एकत्र मोट बांधून इस्रायलच्या विरोधात आघाडी उघडली. वेळोवेळी कारस्थान करुन इस्रायलवर हल्ला करण्याच्या बेतात असणाऱ्या सिनवारने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या सहयोगाने क्षेपणास्त्र डागून युद्धाला सुरुवात केली.

हिशेब चुकता केला!
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू माध्यमांशी बोलताना म्हणाले " होलोकॉस्ट नंतर, आमच्या माणसांचा सर्वात मोठा नरसंहार करणाऱ्या नराधमाचा खात्मा करुन आम्ही हिशेब चुकता केला आहे. ही युद्धातली अत्यंत महत्वाची घटना आहे. जे लोक आपआपल्या शस्त्रांचा त्याग करतील, त्यांनाच अभय दिले जाणार आहे." काही दिवसांपूर्वी हमासचा अजून एक वरिष्ठ नेता, इस्माईल हनीयेहचा मृत्यू झाला होता. इस्रायलने हमासच्या बड्या नेत्यांचा खात्मा केल्यामुळे अद्याप तरी, युद्धविराम होण्याची शक्यता नाही.


 
Powered By Sangraha 9.0